

ठाणे : मानवी तस्करीच्या एका प्रकरणातील ३६ वर्षीय महिला आरोपीची ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात पीडित महिला आणि डिकॉय कस्टमर (बनावट ग्राहक) यांची साक्ष नोंदवण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरल्याने, त्यांचे दावे केवळ ‘ऐकीव माहिती’ ठरतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
फिर्यादी पक्ष आरोपीविरुद्धचा गुन्हा संशयातीतपणे सिद्ध करू शकलेला नाही, असे नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. भाकरे यांनी बुधवारी करुणा ऊर्फ गुडीया हेमंत बिस्वास (रा. शिळ डायघर, ठाणे) हिची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
फिर्यादी पक्षाच्या दाव्यानुसार, २६ ऑगस्ट २०१९ रोजी ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने कल्याण येथील ‘शिवा लॉजिंग अँड बोर्डिंग’वर छापा टाकला होता. यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवला होता. पोलिसांनी या छाप्यात आरोपी महिलेला दोन पीडित महिलांसह रंगेहात पकडल्याचा आणि त्यांच्याकडून ४,५०० रुपयांच्या चिन्हांकित नोटा जप्त केल्याचा दावा केला होता.
मात्र, सुनावणीदरम्यान दोन्ही पीडित महिला आणि बनावट ग्राहक न्यायालयात हजर राहू शकले नाहीत आणि त्यांची साक्ष नोंदवता आली नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. न्यायालयाने म्हटले की, साक्षीदारांना समन्स पाठवण्यात आले होते, परंतु फिर्यादी पक्ष त्यांना न्यायालयात हजर करू शकला नाही.
पंच साक्षीदारही फितूर
या प्रकरणातील एक पंच साक्षीदारही फितूर झाला. उलटतपासणीदरम्यान त्याने कबूल केले की, त्याने छाप्यापूर्वीच्या आणि छाप्यानंतरच्या पंचनाम्यांवर घटनास्थळाऐवजी थेट पोलीस ठाण्यात जाऊन स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यामुळे त्याची साक्षही न्यायालयात विश्वासार्ह ठरली नाही.