ठाणे : ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेने स्वतःचे नाव बदलून तसेच या नावाची खोटी कागदपत्रे सादर करून व्हिसा आणि पासपोर्ट मिळवत थेट पाकिस्तान गाठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधी एक महिन्याच्या व्हिसावर पाकिस्तानला जावून आल्यानंतर तिने पुन्हा सहा महिन्यांचा व्हिसा काढला आणि तेव्हा इंटेलिजन्सच्या रडारवर हे प्रकरण आले. नगमा नूर मकसूद अली असे या महिलेचे नाव असून या महिलेच्या आणि तिच्या साथीदारांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी ती पाकिस्तानला गेली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
नगमा नूर मकसूद अली असे मूळ नाव या महिलेचे असून सनम खान असे तिने आपले बदलेले नाव आहे. सदरची महिला ही ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात राहणारी आहे. सनम खान या नावाचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून ते दस्तावेज पासपोर्ट कार्यालय आणि पोलीस ठाण्यात सादर करून तिने पाकिस्तानचा व्हिसा मिळवला. नवऱ्याशी झालेल्या भांडणामुळे फेसबुक आणि इंस्टाच्या माध्यमातून बशीर नावाच्या पाकिस्तानी नागरिकाच्या प्रेमात ही महिला पडली. त्यानंतर त्याला भेटायला जाण्यासाठी या महिलेने खोटी कागदपत्रे सादर करून व्हिसा मिळवला असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा पाकिस्तान दौरा सुरू झाल्यावर या महिलेची लहान मुलगी देखील पाकिस्तानला गेली होती असे समोर आले आहे.
पासपोर्ट आणि व्हिसा काढण्यासाठी तिने खोटे कागदपत्र दिले असे वर्तक नगरमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलीस,तसेच व्हिसा आणि पासपोर्ट देताना झालेले झालेल्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेत हलगर्जीपणा समोर आला आला असल्याचे स्पष्ट उघड झाले आहे.
" आम्ही कोणत्याही प्रकारची खोटी कागदपत्रे सादर केलेली नसून सर्व कागदपत्रे ही खरी आहेत. तसे असते तर आम्ही प्रसार माध्यमांसमोर आलोच नसतो. फक्त जे नाव बदलण्यात आले आहे त्यावरून कोणी गोंधळ घालू नये आम्ही ते ऑनलाईन बदलले आहे. माझ्या मुलीचे आणि माझ्या नातीचे कागदपत्रे खरे असून रीतसर तिने पाकिस्तानमध्ये राहत असलेल्या मुलाशी लग्न केले आहे. आमची पाकिस्तानमध्ये देखील कोणत्याच प्रकारची चौकशी झाली नाही.
- हाजरा परवीन, पाकिस्तानला गेलेल्या मुलीची आई
" हा प्रकार समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास अनेक केंद्र सरकारच्या यंत्रणा करत आहेत. त्यामुळे आम्ही तपासाची माहिती देवू शकत नाही.आमचा तपास पूर्ण झाल्यावर आम्ही याबाबत सर्व माहिती देण्यात येईल. "
- अमरसिंग जाधव, पोलीस उपायुक्त