

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता कल असल्याने त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येवर होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने 'दिशा' उपक्रम, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विविध अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात तब्बल ८ हजार २८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ३२८ शाळा आहेत. अनेक शाळांची झालेली दुरवस्था, शिक्षकांची कमतरता, शैक्षणिक साहित्याचा अभाव आणि दुसरीकडे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वाढते आकर्षण व आकर्षक पायाभूत सुविधा यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
या विविध उपक्रमांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या १ हजार ३२८ शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी राबविण्यात आलेल्या प्रवेशोत्सवात इयत्ता पहिलीत ८ हजार २८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. यामध्ये ४ हजार १३६ विद्यार्थिनी आणि ४ हजार १४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
झेडपी शाळांमधील तालुकानिहाय आकडेवारी
तालुका - प्रवेश संख्या
कल्याण - ९८८
अंबरनाथ - ८४७
मुरबाड - १,५३५
शहापूर - २,७०१
भिवंडी - २,२०९
एकूण - ८,२८०
'दिशा' प्रकल्पाला यश
झेडपीच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून गेल्या काही महिन्यांपासून 'दिशा' प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर ओळखून त्याला वैयक्तिक शिक्षण दिले जात आहे. तसेच वाचनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी स्तरनिहाय शिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता.
ठाणे महापालिकेनेही इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी कंबर कसली आहे. डिजिटल पद्धतीने तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून नव्याने सीबीएसई शाळाही सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम होत असून, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महापालिका क्षेत्रातील ठामपाच्या शाळांमधील इयत्ता पहिलीत ९१५ नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
मिताली संचेती, उपायुक्त ठाणे पालिका