ठामपाने पार केला ६०० कोटींचा टप्पा! मालमत्ता कर वसुलीतील अभय योजनेचा ठाणेकरांनी घेतला लाभ; ११५ कोटींची थकबाकी झाली वसूल

नागरिकांच्या प्रतिसादामुळे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६०० कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे.
ठामपाने पार केला ६०० कोटींचा टप्पा! मालमत्ता कर वसुलीतील अभय योजनेचा ठाणेकरांनी घेतला लाभ; ११५ कोटींची थकबाकी झाली वसूल

ठाणे : मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेले अभियान, थकबाकीवरील दंड माफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने १५ जानेवारीपर्यंत ६१० कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. त्यात ११५ कोटी रुपयांच्या थकबाकीचाही समावेश आहे. १५ डिसेंबरपासून लागू करण्यात आलेल्या थकबाकीवरील दंडमाफीच्या अभय योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, अभय योजनेच्या काळात ४८.६४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मालमत्ता कर विभागास यश मिळाले आहे.

नागरिकांच्या प्रतिसादामुळे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६०० कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे. गेल्यावर्षी या कालावधीपर्यत ५६० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसुल झाला होता. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, मालमत्ता करातून मार्च-२०२४ पर्यंत एकूण ७९२ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेच्या आवाहनास दिलेल्या प्रतिसादाबद्दल आयुक्त अभिजीत बांगर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

काही करदात्यांनी अद्यापपर्यत आपला कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पध्दतीने मालमत्ताधारकांकडे पोहचविण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ठाणेकर घरबसल्या ऑनलाईन कर भरणा करू शकतात. त्यामुळे त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायं. ५.०० तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सर्व शनिवार, सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० व रविवार, सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत कराचा भरणा करता येईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच करदाते ऑनलाईन पद्धतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात. तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

१५ दिवस ५० टक्के दंडमाफीची सवलत

करदात्यांनी अभय योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. पुढील १५ दिवस ५० टक्के दंडमाफीची सवलत सुरू राहणार आहे; मात्र, त्यानंतरच्या कालावधीत कर थकीत ठेवणाऱ्या करदात्यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल. यामध्ये मोठ्या थकबाकीदारांपासून सुरुवात करून कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल. शहर विकासात मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी वेळेत मालमत्ता कर भरण्याचे सामंजस्य नागरिकांनी दाखवून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

अभय योजनेचा पुढचा टप्पा

जे करदाते १६ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी व कराधान नियम ४१(१) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या ५०% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम ४१(१) अन्वये आकारलेल्या शास्तीवर ५०% सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यानी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल, अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार नाही.

प्रभाग समिती निहाय

झालेली वसुली

प्रभाग समिती एकूण वसुली टक्केवारी

उथळसर ४०.५१ ७२%

नौपाडा कोपरी ७९.११ ७६%

कळवा २ ०.०० ५६%

मुंब्रा ३६.२० ७५%

दिवा ३७.८१ ७३%

वागळे इस्टेट २३.०० ६८%

लोकमान्य सावरकर २३.९० ६३%

वर्तकनगर ९१.७० ७१%

माजिवडा मानपाडा १९३.०१ ६९%

मुख्यालय ६५.६१ ८५%

एकूण ६१०.८६ ७७%

logo
marathi.freepressjournal.in