स्मशानभूमींतील धुरापासुन होणार ठाणेकरांची सुटका

संपूर्णपणे स्माशानभूमीचे नव्याने सुशोभीकरण व्हावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक प्रयत्नशील होते.
स्मशानभूमींतील धुरापासुन होणार ठाणेकरांची सुटका

ठाणे शहरातील अनेक स्मशानभूमी जुन्या झाल्या आहेत. त्यांच्या आजूबाजूला नागरी वस्ती वाढत असल्याने स्मशानभूमी स्थलांतरित कराव्यात, त्यातील धुराचा त्रास थांबवा अशा नागरिकांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे येत आहेत. शिवाय नवीन स्मशानभूमींसाठी जागा मिळत नाही. सध्याच्या स्मशानभूमीत अनेक गैरसोयी असून अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा मिळण्याकरिता जुन्या झालेल्या सर्व स्मशानभूमींचे अद्ययावत पद्धतीने सुशोभीकरण करून त्यात गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या बसविल्या जाव्यात व संपूर्णपणे स्माशानभूमीचे नव्याने सुशोभीकरण व्हावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक प्रयत्नशील होते.

ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाच्या ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमींच्या विकासासाठी राज्य सरकारकडे ५० कोटी निधीची मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली असून त्यासाठी तितक्या निधीची तरतूद राज्य सरकारने केली आहे. यात चालू आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केल्याने आता स्मशानभूमींच्या विकासकामाला पुढील काही महिन्यात लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे शहरातील रामबाग, येऊर गाव, बालकुम, मोघरपाडा, वाघबीळ गाव, माजिवडा गाव या पाच ठिकाणच्या स्मशानभूमींचे टप्प्या टप्प्याने आधुनिकीकरण व सुशोभीकरण केले जाणार असून तेथे गॅस दाहिन्या बसवल्या जाणार आहेत व त्यासाठी राज्य सरकारने ५० कोटींची तरतूद केली गेली आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने लाकूड जाळून अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळे तेथील राखेचा-धुराच्या वासाचा त्रास नागरिकांना होतो. इलेक्टि्रक म्हणजेच विद्युत दाहिनी बसविल्यास त्यावर वीज बिलाचा खर्च अधिक होतो. त्यामुळे ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी आता स्मशानभूमींचे नूतनीकरण करताना सीएनजी / एलपीजी गॅस दाहिनी मशीन बसविली जाणार आहे. त्याचवेळी तेथे 'स्मोक न्यूसन्स अबेटमेन्ट सिस्टीम' म्हणजेच 'धुराचा उपद्रव कमी करणारी यंत्रणा' बसवली जाणार आहे. या यंत्रणेमुळे अग्निसंस्कार झाल्यानंतर प्रदूषण होत नाही. धूर व राखेचे कण म्हणजे बॉयलरमध्ये धूर जातो, त्याचे शुद्धीकरण त्या मशीनमध्ये होते व शुद्ध झालेली हवा ३० मीटर उंच चिमणीमधून शुद्ध करून बाहेर फेकली जाते. या आधुनिक यंत्रणेमुळे ८० टक्के वायू प्रदूषण कमी होईल, त्यामुळे टप्प्या-टप्प्याने माझ्या मतदारसंघातील सर्व स्मशानभूमींमध्ये या मशिनरी लावल्या जातील व सर्व स्मशानभूमींचे आधुनिकीकरण केले जाईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in