ठाणेकरांना वाढीव पाण्याची प्रतीक्षा; वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत जलस्रोताचे प्रमाण अतिशय कमी

ठाणेकरांना वाढीव पाण्याची प्रतीक्षा; वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत जलस्रोताचे प्रमाण अतिशय कमी

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे २७ लाख लोकसंख्येसाठी सध्या ५८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात ठाणेकरांना तीव्र पाणीटंचाई सहन करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासूनच ठाण्याच्या घोडबंदर परिसरात पाण्यासाठी उपाययोजना करण्याला सुरुवात होते. या परिसरात पाणीटंचाईमुळे पाण्याच्या टँकरची मागणी वाढत असल्याचे चित्र सर्रासपणे पहावयास मिळत आहे. ठाणे शहराच्या वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत जलस्रोताचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे शहरी भागांना वर्षभर कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागांतील लोकवस्तींना उन्हाळ्याच्या ४ महिन्यांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागे. आता उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागताच अनेक सोसायट्यांची पाण्याच्या टँकरची शोधाशोध करण्यास सुरुवात होते. विशेष करून ठाणे शहरातील घोडबंदर, कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात उन्हाळ्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवते, यामुळे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असला तरी आजही येथील नागरिक वाढीव पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे २७ लाख लोकसंख्येसाठी सध्या ५८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र लोकसंख्येच्या मानाने शहराला आजमितीस ६०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. ठाणे शहराला महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० द.ल.लि, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ द.ल.लि., स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रा कं. प्रा. लि. कडून ११५ द.ल.लि., बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ८५ द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु आगामी ३० वर्षामध्ये शहराची वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन मुबलक व योग्य प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरातील पाणी समस्यांबाबत बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये बारवी धरणातून पाण्याचा कोटा महापालिकेस देणेसाठी तसेच धरणाच्या वाढलेल्या उंचीच्या प्रमाणात साठा १०० द.ल.लि. करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत. या बैठकीत भातसा धरणातून ठाणे महानगरपालिकेच्या योजनेद्वारे सध्या २५० द.ल.लि. पाणी उचलले जाते. त्यामध्ये ५० द.ल.लि.ची वाढ करून अतिरिक्त कोटा मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सूचना दिल्या होत्या. ५० द.ल.लि.चा कोटा उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागास विनंती करण्यात आली आहे. दुसरीकडे सूर्या धरणातून ५० दशलक्ष पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा केली जात आहे. त्यातील पाणी हे घोडबंदरकरांना मिळणार आहे. स्टेमकडून ५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध व्हावे, तसेच विक्रमगड तालुक्यातील देहरजी धरणातून २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा व्हावा यासाठी देखील महापालिकेने संबंधित यंत्रणांकडे पत्रव्यवहार केला आहे.

ठाणे महानगरपालिकेस सद्यस्थितीमध्ये ६१६ द.ल.लि. प्रतिदिन एवढा कोटा मंजूर आहे. २०५५ पर्यंत भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता साधारणत: १११६ द.ल.लि. प्रतिदिन एवढा पाणीपुरवठा अपेक्षित असून त्यानुसार महानगरपालिकेस नियोजन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी भविष्यात होऊ घातलेल्या काळू धरणातून ४०० द.ल.लि. प्रतिदिन एवढा पाणीसाठा महानगरपालिकेस उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. शिवाय भविष्यात प्रस्तावित असलेल्या मुमरी धरणातून देखील १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मिळावा यासाठी देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

पारंपरिक जलसाठ्याकडे दुर्लक्ष

शहरी भागात पर्जन्य जलसंधारणामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. मात्र याबाबतीत 'कळते पण वळत नाही' अशी परिस्थिती आहे. काही विहिरी बुजवून त्यावर चक्क बांधकामे उभी केल्याची चित्र देखील अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. ठाणे शहरात पूर्वी ६५ तलाव होते. आता जेमतेम ३५ तलाव उरले असून त्यातील अनेक तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यानुसार सूर्या, बारवी, एमआयडीसी, देहरजी आणि स्टेमला वाढीव पाण्यासाठी महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. परंतु मागील चार ता पाच महिन्यांपासून या संदर्भात बैठकच लावली न गेल्याने ठाणेकरांना वाढीव पाणी केव्हा मिळणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

अनेक वर्षांपासून पाण्याचे लेखापरीक्षण नाही

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण मागील अनेक वर्षांपासून करण्यात आलेले नाही. २००७ सालानंतर शहरातील पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण झालेले नाही. पालिका हद्दीत पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोताकडून किती पाणी घेतले जाते आणि प्रत्यक्षात पाण्याचा पुरवठा नेमका किती होतो, याची माहिती पालिकेकडे नाही. पाण्याची गळती नासाडी किती होते याची माहिती नसल्याने पाण्याचे नियोजन करण्यात अडचणी येतात.

गळती रोखण्याचे आव्हान

प्रत्यक्ष जलसाठ्यातून उचल ते घरात पोहोचेपर्यंत विविध टप्प्यांवर मोठ्या प्रमाणात गळतीमुळे ३० ते ३५ टक्के पाणी वाया जाते. पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या जलसंपदा विभागाला पाण्याची ही गळती रोखता आलेली नाही. गेल्या ३-४ महिन्यांत विविध ठिकाणी जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in