'त्या' चिमुकलीला बालकल्याण समितीने कुशीत घेतले

ठाणे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी बैसाणे, सदस्य ॲड. मनीषा झेंडे यांनी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात भेट दिली
'त्या' चिमुकलीला बालकल्याण समितीने कुशीत घेतले

उल्हासनगर : काही तासांच्या स्त्री जातीच्या नवजात जिवंत अर्भकाला सार्वजनिक शौचालयाच्या भांड्यात टाकण्यात आल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना उल्हासनगरात उघडकीस आली होती. या चिमुकलीला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ठाणे बालकल्याण समितीने नुकतीच भेट देऊन 'तिला' कुशीत घेतले आहे.

ठाणे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राणी बैसाणे, सदस्य ॲड. मनीषा झेंडे यांनी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात भेट दिली असून, रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांच्याकडे चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच चिमुकलीला कुशीत घेतले आहे. डॉक्टरांनी तत्काळ उपचारास सुरुवात केल्याने चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. प्रकृतीचा उत्तम रिपोर्ट प्राप्त झाल्यावर तिचा ताबा घेण्यात येणार आहे.

चिमुकलीचे नामकरण आम्रपाली

याबाबत संदीप डोंगरे यांनी विठ्ठलवाडी ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडस नवजात चिमुकलीला शौचालयाच्या भांड्यात टाकणाऱ्या निर्दयी मातेचा शोध करण्यास सुरुवात केली आहे. आम्रपाली नगर परिसरात ही चिमुकली सापडल्याने नागरिकांनी तिचे नाव 'आम्रपाली' ठेवले आहे. दरम्यान, ३० डिसेंबर २०१८ मध्ये प्लास्टिकच्या पिशवीत नाल्यात जिवंत टाकण्यात आलेल्या एका अर्भकाला अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे यांनी वाचवले होते. रगडे यांनी या बेवारस अर्भकाचे नाव 'टायगर' ठेवले होते. शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यावर इटलीमधील एका दाम्पत्याने टायगरला दत्तक घेतले आहे. शौचालयाच्या भांड्यात टाकण्यात आलेली बेवारस चिमुकली देखील अतिशय गोंडस असल्याने तिला दत्तक घेण्यासाठी नागरिक पुढे येण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in