ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दीपावली पूर्व व दीपावली कालावधीत शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच २४५ इतके आढळले. तसेच, यादिवशी हवेतील ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजनचे प्रमाण ५६ तर सल्फर डाय ऑक्साइडचे प्रमाण २९ इतके होते. त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक १९७ इतका होता. दीपावली पूर्व कालावधीत २१ ऑक्टोबर रोजी हवेतील धुलीकणांचे प्रमाण १५२ होते, तर हवेतील ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजनचे प्रमाण ४८, तर सल्फर डाय ऑक्साइडचे प्रमाण २५ इतके होते. त्यावेळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३५ इतका होता.
यावर्षी दिवाळी सण मोठ्या उत्साहत आणि मनसोक्त साजरा केला गेला. त्यामुळे फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे पहावयास मिळाले. सन २०२१ च्या दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता सन २०२२ मध्ये हवेतील प्रदूषणाच्या पातळीत ४ टक्के तर ध्वनी प्रदूषणात २४ टक्के वाढ झाल्याचे उघडकीस आले. हीच परिस्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात अनेक संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यंदाच्या दीपावलीच्या सणाच्या दरम्यान गत वर्षीच्या तुमच्यात १५ ते २० टक्के प्रदूषण वाढले असल्याचे उघड झाले आहे. मात्र यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी ८ ते रात्री ९.३० दरम्यान सर्वात जास्त आवाजाची पातळी नोंदवली गेली. फक्त फटाक्यांची नव्हे, तर राजकीय पक्षांनी जे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते, त्यासाठी लावण्यात आलेल्या डीजेमुळे प्रदूषणाची पातळी १०० डेसीबलपर्यंत गेल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे कोर्टाचे आदेश आणि फटाके फोडण्यावर निर्बंध असतानाही ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. शांतता क्षेत्रासाठी ठरवून दिलेली आवाजाची मर्यादा दिवसा ५० तर रात्री ४० डेसिबल इतकी मर्यादित असावी, असा सर्वसाधारण नियम आहे. मात्र दीपावलीच्या काळात मुख्यतः सकाळी आणि संध्याकाळनंतर रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्यात येतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते हे वेळोवेळी उघड झाले आहे.