मुरुड तालुक्यात पावसाचे आगमन ,शेतकरी वर्ग सुखावला

आता भाताचे राब मोठे करण्याकडे सगळयांचे लक्ष लागलेले असल्याचे पहावयास मिळत आहे
मुरुड तालुक्यात  पावसाचे आगमन ,शेतकरी वर्ग सुखावला

अर्धा जून महिना संपला तरी जोरदार पावसाला सुरुवात झाली नव्हती. मुरुड तालुक्यात पावसाचे आगमन रखडल्याने खरीपाची पेरणी लांबणीवर पडणार काय आणि पेरण्या लांबल्या तर शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून पडणार अशी विचित्र अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाची समाधानकारक सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मागील दोन दिवस पाऊस चांगला झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन आता भाताचे राब मोठे करण्याकडे सगळयांचे लक्ष लागलेले असल्याचे पहावयास मिळत आहे.

शनिवारी सकाळच्या सुमारास आभाळात ढग जमा होऊन वातावरणात गारवा निर्माण झाल्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. दोन तास सलग पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे. आता शिवारात पेरणी हंगामास निश्चितपणे सुरुवात होईल अशी परीस्थीती आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतीची आंतरमशागत, बांधबंधीस्ती, जनावरांचे वैरणाचा भरणा, गोठा बांधणी आदी कामांना प्राधान्य दिले होते. खरीपाच्या पेरणीची तयारी या भागात शेतकऱ्यांनी केली असून केवळ पेरणी योग्य पावसाची प्रतिक्षा या भागातील शेतकरी करत होते. पावसाच्या आगमनाने सर्वत्र समाधान व्यक्त होत असले तरीही अजूनही सुरुवातीला भरपूर प्रमाणात पाऊस होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतामधील राब मोठे झाले तरच पेरणीला सुरुवात होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in