मोठी वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर

मोठी  वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर

दरवर्षी वृक्ष लागवडीवर राज्यसरकार तसेच महापालिकेकडून काेट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र आहेत त्या झाडांची निगा आणि देखभाल मात्र केली जात नसल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. विशेष म्हणजे वाढत्या नागरीकरणाच्या संकटात आणि वाढत्या सिमेंटच्या जंगलात वृक्षांचा निभाव लागणे कठीण होऊन बसले आहे. रुजण्यास जमिनीत जागा मिळत नसल्याने दरवर्षी असंख्य झाडे उन्मळून पडत आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तलावपाळी या गजबजलेल्या परिसरात चालत्या रिक्षावर झाड पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढले असून पावसाळा आणि वादळी वाऱ्यात महाकाय वृक्षांना धोका अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागात कृषी पदवीधारकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र असे असूनही झाडांची निगा राखण्याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे. या विभागावर प्रशासनासह समितीचेही नियंत्रण नसल्याने शहराचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. विशेष म्हणजे शेकडो वर्षे जुने असलेले डेरेदार वृक्ष मूळ रुजण्यास जागा नसल्याने सुकत आहेत किंवा उन्मळून पडू लागले आहेत. ठाणे शहर जसे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते तसेच पुरातन काळापासून वड-पिंपळ अशा मोठ्या वृक्षांचे शहर म्हणूनही ओळखले जात होते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष करुन वडाच्या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात झाली आहे. शहरात स्थानिक झाडांची संख्या कमी झाल्यामुळे बरेच वेळा सुभाबूळ, आसुपालव, सोनमोहर, गुलमोहर यांसारखी झटपट वाढणारी झाडे लावण्यात येतात. मात्र या झाडांचा पर्यावरणाच्या दृष्टीने फारसा उपयोग पडत नाही. त्यातच विकासकामांच्या नावाखाली तसेच रस्ते दुरुस्तीसाठी काँक्रीटीकरण करण्यात येत असल्याने झाडांची वाढ खुंटू लागली आहेत, तसेच उन्मळून पडण्याचा धोका वाढू लागला असल्याचे दिसत आहे.

‘झाडे लावा, झाडे जगवा’, असा संदेश देऊन महापालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी जनजागृती मोहीम राबवते. नवीन वृक्षारोपण करुन शहर हिरवेगार करण्याचा प्रयत्न करत असली तरी वास्तवात झाडांच्या जोपासनेबाबत पालिका वृक्षप्राधिकरण विभाग उदासिन आहे. शहराचे ह्दय म्हणून आेळखल्या जाणाऱ्या मासूंदा तलावासभोवती वड, पिंपळ, गुलमोहर, रेन ट्री सारखे टूमदार वृक्ष परिसराची शोभा वाढवत आहेत. त्यामुळे दुपारच्या रणरणत्या उन्हात देखील या परिसरातून चालना थकवा जाणवत नाही. त्यामुळे तलावाकाठी झाडांच्या सावलीतून चालण्याचा अनोखा अनुभव सर्व घेतात. मात्र पालिकेच्या भोंगळ कारभाराची झलक या ठिकाणी बघायला मिळते आहे. या ठिकाणी तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सिमेंटचा वापर करून जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आले असल्याने हे सुशोभीकरण वृक्षांच्या मुळावर उठले असल्याचे उघड होऊ लागले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in