राष्ट्रीय महामार्गावरील जीर्ण पुलावर भगदाड; महामार्ग प्रशासनाकडून तात्पुरती उपाययोजना

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मागील पावसाळ्यात चिंचपाडा येथील पुल जीर्ण झाल्यामुळे पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली. त्यांनतर या पुलावरील वाहतूक थांबवण्यात येऊन पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती.
राष्ट्रीय महामार्गावरील जीर्ण पुलावर भगदाड; महामार्ग प्रशासनाकडून तात्पुरती उपाययोजना

नितीन बोंबाडे /पालघर

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईवाहिनीवरील धानिवरी येथील सुसरी नदीवर असलेला पुल जीर्ण झाला असून, या पुलावर मध्यंतरी भगदाड पडले होते. पुल आधीच जीर्ण झाला असून, त्यात पुलावर खड्डा पडल्यामुळे याठिकाणी पुलाच्या नूतनीकरणाचे गरज व्यक्त करण्यात आली होती; मात्र तत्कालीन महामार्ग प्रशासनाकडून याठिकाणी तात्पुरती उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सध्या महामार्गावर काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू असून, या पुलाची दुरुस्ती न करता यावरून काँक्रीटीकरण केल्यास भविष्यात पुलाला धोका निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मागील पावसाळ्यात चिंचपाडा येथील पुल जीर्ण झाल्यामुळे पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली. त्यांनतर या पुलावरील वाहतूक थांबवण्यात येऊन पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. सध्या मनोर वाडा रस्त्यावर टेन जवळील पुल जीर्ण आणि धोकादायक ठरल्यामुळे येथून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशीच परिस्थिती काहीशी परिस्थिती राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी येथील पुलाची असून, याची वेळीच दखल न घेतल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे.

धानिवरी येथील सुसरी नदीवर पुल एकेरी महामार्ग असल्यापासून अस्तित्वात आहे. महामार्गावरून रोजच्या वाहतुकीत मोठा बदल झाला असून, सध्या मोठ्या प्रमाणात वाहने या पुलावरून प्रवास करतात. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून अडचणी निर्माण होत असतात. मध्यंतरी पावसाळ्यात या पुलावर पुल जोडण्यासाठी असलेल्या सांध्याजवळ (एक्सपेंशन जॉइंट जवळ) मोठा खड्डा पडला होता. पुल जीर्ण झाला असून यावरील खड्ड्यांमुळे भविष्यात निर्माण होणारा धोका पाहता पुलाच्या पुनर्बांधणीची गरज व्यक्त करण्यात आली होती. तत्कालीन ठेकेदार कंपनी कडून याठिकाणी वेळोवेळी तात्पुरत्या उपाययोजना करून वेळ मारून नेन्यात आली आहे; मात्र सद्यस्थितीत पुलावरील खड्डा दिसून येत नसला तरी पुल वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असून, काँक्रीटीकरण केल्यानंतर भविष्यात पुलाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

धानिवरी येथील सुसरी नदी पुलावरील खड्ड्यांबाबत आम्हाला कल्पना नव्हती. प्रसारमाध्यम प्रतिनिधींकडून आम्हाला माहिती मिळाली असून, लवकरच याठिकाणी चौकशी केली जाईल. पूल धोकादायक असल्याचे आढळल्यास या ठिकाणी आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येतील.

- सुहास चिटणीस, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

गेल्या चार ते पाच वर्षांपासून या पुलावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. पुलावर एका ठिकाणी भगदाड पडले असून, आम्ही वेळोवेळी संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे; मात्र संबंधित प्रशासनाकडून वेळोवेळी याठिकाणी तकलादू तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या काँक्रीटीकरण कामामध्ये या पुलाची दुरुस्ती रखडण्याची भीती आहे. त्यामुळे भविष्यात निर्माण होणारा धोका लक्षात घेता काँक्रीटीकरण करण्यापूर्वी पुलाची दुरुस्ती करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

- हरबंस सिंह नन्नाडे, महामार्ग अभ्यासक

भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकेरी महामार्ग असल्यापासून अस्तित्वात असलेले अनेक पूल पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील धानिवरी येथील मुंबईवाहिनीवरील पूल जीर्ण झाला असून, गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. यातील एक खड्डा धोकादायक असून, तत्कालीन देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीकडून याठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुलाच्या खालच्या बाजूला काही ठिकाणी स्लॅबमधील लोखंड गंजल्यामुळे प्रसरण पावले आहे. परिणामी स्लॅबला तडे जाऊन प्लास्टर निखळल्याचे दिसून येत आहे. सध्या पुलाच्या खालच्या भागात काँक्रीट टाकून प्लास्टर केल्यामुळे पुलावरील खड्ड्यांची तीव्रता जाणवत नसली, तरी पुलावरून होणारी वाहतूक पाहता भविष्यात येथे मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in