अंबरनाथ शहराची वाटचाल वैद्यकीय स्वयंपूर्णतेकडे

अंबरनाथ शहराची वाटचाल वैद्यकीय स्वयंपूर्णतेकडे

अंबरनाथमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचे काम सुरू असतानाच अंबरनाथमध्ये आणखी एका अत्याधुनिक रुग्णालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने चार एकरचा भूखंड अंबरनाथ नगरपरिषदेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अंबरनाथ शहराची वाटचाल वैद्यकीय स्वयंपूर्णतेकडे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अंबरनाथ शहराला वैद्यकीय दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे अंबरनाथ नगरपरिषदेला राज्य शासनाकडून डीडी स्कीममधील भूखंड रुग्णालय वापरासाठी हस्तांतरित केला जाणार आहे. मौजे कानसई येथील सिटी सर्वे नंबर ४४९०(अ) हा चार एकराचा आणि सुमारे ६० ते ७० कोटी बाजारमूल्य असलेला हा भूखंड आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरात अत्याधुनिक रुग्णालयाच्या उभारणीला मदत होणार आहे. अंबरनाथ शहर मुंबई महानगर क्षेत्रातील वेगाने विकसित होणारे शहर असले तरी अत्याधुनिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधांची या शहरात आजही वानवा आहे. उच्च दर्जाच्या वैद्यकीय उपचारासाठी आजही अंबरनाथ व परिसरातील रुग्णांना ठाणे किंवा मुंबई येथील बड्या रुग्णालयात धाव घ्यावी लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ येथेच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे.

या नियोजनाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मौजे कानसई, येथील चार एकरचा भूखंड अंबरनाथ नगरपरिषदेस हस्तांतरित करण्याची मागणी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्या अनुषंगाने अखेर शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून हा भूखंड अंबरनाथ नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. या बद्दलचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे. सदर भूखंड भोगवटा मुल्यरहित व कब्जे हक्काने नगरपरिषदेस देण्याबाबत शासनाने जिल्हाधिकारी ठाणे यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे अंबरनाथ शहरात आणखी एक रुग्णालय लवकरच उभे राहणार असून अंबरनाथकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in