ठाणे शहरातील बहुतांशी रस्त्यांची प्रचंड दुरावस्था

रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्ते अशी भयावह परिस्थीती झाली आहे
 ठाणे शहरातील बहुतांशी रस्त्यांची प्रचंड दुरावस्था

दरवर्षी प्रमाणे शहरातील बहुतांशी महत्वाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या अगदी लगत असलेल्या ठाणे शहर आणि आणि परिसरात बहुतांशी लहान मोठ्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे.

रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्ते अशी भयावह परिस्थीती झाली आहे. काही मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा ते एक तास लागत असल्याने प्रवासी आणि रहिवासी हवालदिल झाले आहेत.

या महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाची संततधार कायम असल्याने शहरातील बहुतांशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. एका किलोमीटरच्या प्रवासासाठी अर्धा अर्धा तास लागत होता. विशेष म्हणजे दिवसेंदिवस रस्त्यावर येणाऱ्या गाड्यांचे प्रमाण वाढत आहे, तर रस्ते मात्र दुरावस्थेत असल्याने येत्या काही दिवसात परिस्थिती अत्यंत भयावह होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडलेले असल्याने सर्वसामान्य ठाणेकर या वाहतूक कोंडीमूळे चांगलाच वैतागला आहे. सकाळी कामावर जाणारा नोकरदार वर्ग यांना या वाहतूक कोंडीचा त्रास मुख्यत्वे सहन करावा लागत असून कळवा नाका, जांभळी नाका, टेंभीनाका, स्टेशन रोड, नौपाडा, कापूरबावडी चौक, तलावपाळी, राम मारूती रोड, कोपरी या सर्व महत्वाच्या रस्त्यांवर दररोज प्रचंड वाहतूककोंडी झालेली दिसते. मोठं मोठ्या खड्यातून त्रास सहन करत ठिकठिकाणी होणार्‍या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याची कसरत रहिवाशांना करावी लागत आहे.

शहरातील खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी गेल्या काही वर्षात बरेच प्रयोग करण्यात आले. परदेशी तंत्राचा वापर करण्यात आला, दरवर्षी ज्या ठिकाणी खड्डे पडतात त्यांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे प्रयत्न झाले, मात्र तरी काही फरक पडला नाही. २०१५ पासून शहरातील रस्ते काँक्रीटीकरण करण्याचा नवा उपाय शोधण्यात आला त्यातून रस्ते काँक्रीट करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र या रस्त्यावरही खड्डे पडत असल्याने खड्यांवर कोणता उपाय शोधायचा असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in