ठाण्यातील खड्ड्यांची परिस्थिती अधिकच बिकट;मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडीचा प्रवाशांना मोठा त्रास

पुण्यात प्रत्येक खड्ड्यासाठी ठेकेदाराकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला
ठाण्यातील खड्ड्यांची परिस्थिती अधिकच बिकट;मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडीचा प्रवाशांना मोठा त्रास

ठाणे शहराबाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी सुटावी यासाठी गेल्या दशकापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र तरी वाहतूककोंडी सुटलेली नाही उलट ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि अवजड वाहनांमुळे परिस्थिती अधिक बिकट होवू लागली आहे. प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे शहरात प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून पक्के रस्ते देण्याचे प्रयत्न सुरु असले तरी या रस्त्यांनाही खड्डे पडत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान पुण्यात प्रत्येक खड्ड्यासाठी ठेकेदाराकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातही असाच निर्णय जर घेतला तर पालिकेची तिजोरी सावरण्याबरोबरच गेल्या काही वर्षात ज्या टक्केवारीच्या खेळामुळे रस्ते आणि बहुतांशी विकासकामांचा बट्ट्याबोळ झाला आहे, तो खेळही थांबू शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे.

शहरात पावसाळ्यात रस्त्याची होणारी वाताहत, पडलेले खड्डे आणि वाहतूक पोलिसांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या त्रासात मोठी भर पडू लागली आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पावसाची संततधार कायम असल्याने शहरातील बहुतांशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांच्या रंगाच रांगा लागत आहेत. या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन ज्या यंत्रणांच्या ताब्यात रस्ते आहेत. त्यावरील खड्डे युद्धपातळीवर काम करून बुजवण्यात यावेत असे निर्देशही दिले त्याप्रमाणे एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्यास सुरवात केली. काही प्रमाणात रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली मात्र पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडू लागले असल्याने वाहतूकीचीकोंडी सुरु झाली आहे.

सकाळी कामावर जाणारा नोकरदार वर्ग यांना या वाहतीकोंडीचा त्रास मुख्यत्वे सहन करावा लागत असून कळवा नाका, जांभळी नाका, टेंभिनाका, स्टेशन रोड, नौपाडा, कापूरबावडी चौक, तलावपाळी, राम मारूती रोड, कोपरी या सर्व महत्वाच्या रस्त्यांवर दररोज प्रचंड वाहतूककोंडी झालेली दिसते मोठं मोठ्या पडल्या खड्यातवून त्रास सहन करत ठिकठिकाणी होणार्‍या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्याची कसरत रहिवाशांना करावी लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in