पालिकेची घसरलेली तिजोरी आली रुळावर; चार महिन्यांत ८०० कोटींचा टप्पा ओलांडला

आठ वर्षांपूर्वी जकात बंद करून एलबीटी सुरू केल्यामुळे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न प्रचंड घसरले
पालिकेची घसरलेली तिजोरी आली रुळावर; चार महिन्यांत ८०० कोटींचा टप्पा ओलांडला

गेल्या सात वर्षांत महापालिकेच्या उत्पनाची घसरलेली गाडी २०१९ च्या सुरवातीला बऱ्यापैकी रुळावर आली होती. तसेच गेल्या काही वर्षात महापालिकेने भांडवली खर्चाचा विक्रमही नोंदवला होता, मात्र फेब्रुवारी २०२० मध्ये कोरोनाने हातपाय पसरायला सुरवात केल्यामुळे त्यावर्षी बजेटमध्ये जे ३ हजार ८६१ कोटी उत्पन्नाचे टार्गेट देण्यात आले होते. त्यापैकी मार्चपर्यंत फक्त ६२ टक्के म्हणजे २ हजार ३९७ कोटी रुपयांची वसुली झाली होती. तर २०२१च्या बजेटमध्ये १ हजार १५० कोटी २ लाखांचे उत्पन्न झाले. तुलनेत उत्पन्न हजार कोटींहून कमी झाले होते. मात्र या वाईट दिवसांतून पालिकेची तिजोरी सावरायला लागली असून यंदाच्या पहिल्या चार महिन्यात उत्पन्नाचा ८०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

आठ वर्षांपूर्वी जकात बंद करून एलबीटी सुरू केल्यामुळे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न प्रचंड घसरले. तेव्हा कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसे नसल्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली होती; मात्र तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बऱ्याचदा कठोर निर्णय घेतले. वसुलीत कचुराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी रोखल्या, पाणीपट्टी वसूल करण्यासाठी, मालमत्ता कर वसुलीसाठी चौकाचौकात फलक लावून कर चुकवणाऱ्यांची नवे जाहीरपणे फलकावर लावली. त्यामुळे बऱ्यापैकी उत्पन्न वाढ झाली. सात वर्षांपूर्वी महापालिकेचे उत्पन्न ११५४ कोटी रुपये होते ते २०१९ साली २हजार ५८८ कोटी एवढे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात त्यांना यश आले होते. मात्र, कोरोनामुळे फेब्रुवारी आणि मार्च २०२० मध्ये अपेक्षित वसुली झाली नाही, त्यामुळे २०१९-२० या वर्षीचे उत्पन्न जवळपास २०० कोटींनी घसरले होते. २०२०-२१ ची घसरण १ हजार २७९ कोटींची आहे.

प्रशासनाला करावी लागणार कसरत

मार्च पासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. नव्या निवडणुका कधी होतील, याबातही अद्याप सांशकता आहे. त्यामुळे उरलेल्या आठ महिन्यात अपेक्षित उत्पन्नाचे टार्गेट गाठण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

मालमत्ता कराचे टार्गेट ७१३ कोटींचे

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासुन लॉकडाऊन असल्यामुळे पहिले दोन महिने तर पालिकेच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली होती. मात्र यंदा एप्रिल ते जुलै अशा पहिल्या चार महिन्यात पालिकेच्या उत्पनात मोठी वाढ झाल्याचे उघड झाले आहे. यंदा मालमत्ता कराचे टार्गेट ७१३ कोटीचे असताना जुलै अखेर ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे, शहर विकास विभाग टार्गेट ५८५ कोटी असताना वसुली १४५ कोटींची झाले आहे. पाणीपुरवठा विभागाला २०० कोटी रुपयांचे टार्गेट दिलेले असताना आतापर्यंत १० कोटी ४ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे, तर अग्निशमन दलाला १०४ कोटी रुपयांचे टार्गेट असताना उत्पन्न ५१ कोटी झाले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in