लहानग्या साक्षीचे धावपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार

लहानग्या साक्षीचे धावपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार

लहानग्या साक्षीचे धावपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अवश्य प्रयत्न करावेत त्यासाठी तिला लागेल ती सर्व मदत करू, असे उदगार राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होते ते साक्षीला नवीन अद्ययावत पाय बसवून देण्याचे. साक्षीची केईएम रुग्णालयात भेट देऊन तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च स्वीकारण्याची जबाबदारी शिंदे यांनी उचलली होती. नवीन पाय बसवून तिला पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे करत त्यांनी दिलेला आपला शब्द पूर्ण केला आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात गतवर्षी झालेल्या प्रलयंकारी पावसात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवेळी आपला जीव धोक्यात घालून साक्षी दाभेकर या १४ वर्षांच्या मुलीने एका दोन महिन्याच्या बाळाचे प्राण वाचवले होते. मात्र भिंत अंगावर कोसळल्याने साक्षीच्या पायाला जबर जखम झाली होती. यावर उपचार करण्यासाठी तिला तातडीने मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. साक्षीच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च कसा करायचा? असा प्रश्न तिच्या कुटुंबियाना पडला होता.

साक्षी ही धावपटू असून तालुका स्तरावर कब्बडी आणि खो-खोमध्ये प्रतिनिधित्व करत होती. पण तीला पाय गमवावा लागल्याने कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदतीचे आवाहन केले जात होते. त्यावेळी अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी तिची ही व्यथा लोकांसमोर आणली. त्यानंतर या बातम्यांची दखल घेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिची केईएम रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच तिच्यावरील उपचारांचा सर्व खर्च डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचे जाहीर केले. तसेच साक्षी आणि प्रतीक्षा या दाभेकर भगिनींचे शैक्षणिक पालकत्वदेखील त्यांनी शिवसेनेच्या वतीने उचलत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार साक्षीला मंत्री शिंदे यांच्या बंगल्यावर बोलावून त्यांच्या समक्षच नवीन पाय बसवण्यात आला. आता अधिक चांगल्या दर्जाचा पाय बसवण्यात आल्याने तिला चालणे, हालचाल करणे या गोष्टी अधिक चांगल्या रितीने करता येणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in