आज ‘श्रीमलंगगड यात्रे’च्या उत्सवाला सुरुवात; सुरक्षा व्यवस्थेसाठी १२०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त

इतिहास, परंपरा आणि श्रद्धेने नटलेली श्रीमलंगगड यात्रा यंदाही भाविकांसाठी भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.
आज ‘श्रीमलंगगड यात्रे’च्या उत्सवाला सुरुवात; सुरक्षा व्यवस्थेसाठी १२०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Published on

उल्हासनगर : इतिहास, परंपरा आणि श्रद्धेने नटलेली श्रीमलंगगड यात्रा यंदाही भाविकांसाठी भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगड यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, हजारो भाविक या पवित्र दिवशी भगवान मलंगनाथाच्या दर्शनासाठी गड चढणार आहेत.

दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने १२०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. ४ डीसीपी, १० एसीपी, १२ पीआय, ३८ एपीआय आणि पीएसआय, ६०८ पोलीस कर्मचारी, २५० होमगार्ड तसेच एसआरपीएफ आणि रॅपिड फोर्सच्या तीन तुकड्या यावेळी सुरक्षेसाठी सज्ज असतील. यात्रेचा मुख्य दिवस १२ फेब्रुवारी असल्याने भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही तगडी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेली श्रीमलंगगड यात्रा आजही भव्य स्वरूपात साजरी होत असून, यंदाही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. श्रीमलंगगड यात्रा ही केवळ धार्मिक यात्राच नाही, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. माघी पौर्णिमेच्या शुभदिनी श्रीमलंगनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविक गड चढतात . ही यात्रा हिंदू-मुस्लिम ऐक्याचेही प्रतीक मानली जाते, कारण येथे दोन्ही धर्मांचे भाविक श्रद्धेने सहभागी होतात. यात्रेचा सोहळा ८ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मात्र, मुख्य दिवस १२ फेब्रुवारी असल्याने या दिवशी भाविकांकडून यात्रेचा शिखरबिंदू गाठला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in