
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात उल्हासनगरातील अर्ध्याहून अधिक शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी घर वापसी केली आहे. तर दुसरीकडे शिंदे यांच्या समर्थनार्थ आणि त्यांना ठामपणे साथ देण्यासाठी उल्हासनगर शहरातून राजेंद्रसिंह भुल्लर यांच्या नेतृत्वाखाली सत्य प्रतिज्ञापत्रांचा ओघ सुरू झाला आहे.
प्रत्येक शहरातून सत्य प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यात शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले जेष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, उद्योगपती विक्की भुल्लर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पाच हजार १०० सत्य प्रतिज्ञापत्र सोपवले आहेत. भुल्लर महाराज यांच्या कार्यालयात अजूनही शिंदे समर्थनार्थ पत्र भरण्याची गर्दी सुरू आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे माजी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, उपशहरप्रमुख अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर लिलाबाई आशान, जेष्ठ माजी नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर, रमेश चव्हाण, विजय पाटील, कलवंतसिंह सोहता, स्वप्नील बागूल, अंकुश म्हस्के, विकास पाटील, माजी नगरसेविका चरणजित कौर भुल्लर, पुष्पा बागूल उपस्थित होते.