येऊरचे जंगल अधिक हिरवळीने बहरणार, १०० झाडांची लागवड करण्यात येणार

ठाण्यातील तीन संस्थां एकत्र आल्या आणि वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला.
येऊरचे जंगल अधिक हिरवळीने बहरणार, १०० झाडांची लागवड करण्यात येणार

निसर्गाने नटलेले येऊरचे जंगल..! त्यात वाहणारे ओढे, नदी- नाले, आणि पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण यांमुळे येऊरच्या जंगलात पावसाळी सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. मात्र केवळ निसर्गाचा आनंद लुटण्याऐवजी आपणही या निसर्गाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून ठाण्यातील तीन संस्थां एकत्र आल्या आणि वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला.

विशेष म्हणजे आंबा, वड, जांभूळ, पिंपळ, अशा अस्सल देशी झाडांची निवड वृक्षरोपणासाठी करण्यात आली. शनिवारी या संस्थांच्या माध्यमातून जंगलात तब्बल १०० झाडांची लागवड शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली. त्यामुळे आता येऊरचे जंगल अधिक हिरवळीने बहरणार आहे.

ठाण्यातील वसुंधरा फाउंडेशन, हेलिंग सह्याद्री, मिशन ऑनलाईन स्वराज्य या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऋण वसुंधरेचे’ या मोहिमे अंतर्गत येऊर येथील  विस्तीर्ण परिसरात १०० झाडांची लागवड करण्यात आली. या मोहिमेत विविध संस्थांच्या १२० हून अधिक कार्यकर्त्यानी सहभाग नोंदवला. भविष्यात ही लागवड करण्यात आलेली वृक्ष बहरावीत, त्याची चांगली वाढ व्हावी या उद्देशाने वृक्ष अभ्यासक जयेश लांबोर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासपूर्ण पद्धतीने या वृक्षांची लागवड करण्यात आली.

येऊरच्या जंगलात  पिंपळ, करंज, कदंब, सिताफळ, कांचन, बसावा, ताम्हण, अशोक, औदुंबर, वड, प्राजक्त, फ़णस, आंबा, गुलमोहर, चिकु या सारख्या देशी झाडांची लागवड करण्यात आली.

समाजमाध्यमातून या वृक्षारोपण मोहिमेला प्रसिद्धी देण्यात आल्यामुळे ठाणेकरांसह अनेक पर्यावरण प्रेमींनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. केवळ वृक्ष लागवड न करता त्यांचे संगोपन करण्याचाही संकल्प यावेळी संस्थांनी केला. 

वर्षभरात विविध ठिकाणी देखील अशा प्रकारे वृक्षरोपण उपक्रम, पर्यावरण संवर्धना संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या माध्यमातून वसुंधरेला अधिक फुलविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी हीलिंग सह्याद्री फाउंडेशनच्या दीप्ती कदम यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in