अनिलराज रोकडे/वसई
‛'रॅपन्जेल सिन्ड्रोम!’ वैद्यकीय शास्त्रात केसांमुळेच घडलेली एक दुर्मीळ केस! लहानपणी ऐकलेली लांबसडक केसांच्या राजकन्येची गोष्ट, रॅपुंजल! हे सुंदर केसच तिच्या जीवावर उठतात. प्रत्यक्षात खरोखरच अशाप्रकारे हे केस कुणाच्या जीवावर उठू शकतील, अशी कल्पना करणं सामान्य माणसांसाठी कठीण; मात्र अशी घटना वसईत दुसऱ्यांदा घडली आणि राजपुत्राप्रमाणे या युगातही एका तरुणीची तीच्या पोटातून तब्बल एक किलो वजनाचा 'हेअर बॉल ट्यूमर' महत्प्रयास आणि कौशल्यपूर्वक शस्त्रक्रियेद्वारा काढून सुटका करण्यात आली आहे.
वसईतील सुप्रसिद्ध, तथा ज्येष्ठ सर्जन डॉ. जोसेफ डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली सर्जन डॉ. ओशन डिसोजा, भूलतज्ज्ञ डॉ. शेरेन डिसोजा, आपत्कालीन उपचार तज्ज्ञ डॉ. अेविथ डिसोजा (इमर्जन्सी मेडिसीन) आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रज्ञा ससालेकर यांच्या टीमने हे ऑपरेशन यशस्वी केले. या यशाबद्दल डॉ. डिसोजा आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एप्रिल २०२४च्या पहिल्या आठवड्यात १८ वर्षांची एक तरुणी भयंकर पोटदुखी आणि वारंवार होणाऱ्या उलट्यांमुळे वसईच्या डिसोजा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. खूप प्रयासानेही तिच्या उलट्या थांबत नव्हत्या. काही खाऊ, पिऊ शकत नव्हती. डॉ. जोसेफ डिसोजा आणि त्यांच्या टीमने तीच्या ओटीपोटावर असलेल्या सुजेमुळे या युवतीला सोनोग्राफी करण्याचे सुचविण्यात आले आणि 'हेअर बॉल ट्यूमर'चे निदान झाले. हा केसांच्या गुंत्याचा ट्यूमर साधासुधा नव्हे, तर तब्बल एक किलो वजनाचा! त्यातील टोकाकडचा भाग लहान आतड्यापर्यंत गेलेला. एकूण लांबी ८८ सेमी इतकी! मग सर्व आवश्यक तपासण्या करवून घेत, दि. ११ एप्रिल रोजी डिसोजा हॉस्पिटलमध्ये ही पोटावरील जोखमीची आणि भयंकर अशी १८ टाक्यांची शस्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. रुग्णाने विशिष्ट मानसिक अवस्थेतून किमान चार-पाच वर्षांत खाल्लेल्या केसांमुळे हा ट्यूमर विकसित होत गेल्याचे डॉ. जोसेफ डिसोजा यांनी सांगितले. रुग्णाची प्रकृती सुधारत असून, आता धोक्याच्या बाहेर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.