माघी गणेशोत्सवाची धूम; भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम

ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघी गणेशोत्सवानिमित्त वंदे मातरम् संघातर्फे ठाणे महोत्सव आयोजित केला आहे.
माघी गणेशोत्सवाची धूम; भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम
Published on

ठाणे : ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघी गणेशोत्सवानिमित्त वंदे मातरम् संघातर्फे ठाणे महोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील कचराळी तलावानजीक गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये दि. ०१ ते ०७ फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार असल्याची ठाणे महोत्सवाचे संस्थापक, निमंत्रक संदीप लेले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठाण्यातील वंदे मातरम् संघातर्फे माघी गणेश जयंतीनिमित्त या महोत्सवात दि. ०१ ते ०७ फेब्रुवारी या कालावधीत ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाचे कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन-कीर्तन होणार आहे. शनिवारी दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. श्रींची विधीवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर सकाळी १० वा. सामूहिक अथर्वशीर्ष पठण होईल.

या महोत्सवात होरायझन प्राइम रुग्णालयातर्फे महाआरोग्य शिबीर होणार असून गणरायाच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंदे मातरम‌् संघाच्या संयोजकांनी केले आहे.

मान्यवरांची उपस्थिती

दररोज विविध उद्बोधक, प्रबोधन करणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेश भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री नितेश राणे यांच्यासह सर्वपक्षीय राजकिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार भेट देणार आहेत. यंदा येथील या महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे.

पनवेलमध्ये गणेश मूर्ती स्थापना दिवस

नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी पीएल ५ नवीन पनवेल येथे माघी श्री गणेशोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यानिमिताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माघी गणेशोत्सवासाठी चिरनेर गाव सज्ज

येणाऱ्या माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावातील अत्यंत प्राचीन अशा श्री महागणपती मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन, मंदिर प्रशासनासह चिरनेर ग्रामस्थांनी भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

तालुक्यातील चिरनेर येथे अष्टविनायकासारखे श्री महागणपती हे प्रख्यात देवस्थान असल्याने येथील जागृत महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तगण चिरनेर तीर्थस्थळी येत असतात. या सर्व भक्तगणांची गैरसोय होऊ नये, सर्वांना सुखकर सोयीसुविधा मिळून, रांगेत दर्शन घेता यावे, वाहतूककोंडी होऊ नये, गणेश भक्तांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय व महाप्रसादाची व्यवस्था व्हावी, त्याचबरोबर कोणताही अनुचित व उत्सवाला गालबोट लागणारा प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त, तसेच चिरनेर गणपती देवस्थान प्रशासनाकडून आवश्यक व सुसज्ज असे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष महेंद्रपाटील, उपाध्यक्ष मंगेश पाटील, सचिव अमर ठाकूर, खजिनदार संजय मोकल, विश्वस्त मंगेश पाटील यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in