भाईंंदर : भाईंदर पश्चिमेच्या नारायणा इंग्रजी शाळेच्या व्यवस्थापनाने मनमानी शुल्कवाढ व शुल्क वसुली केल्याने संतप्त पालकांनी शाळेत घेराव घालत निषेध केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शांतता राखण्याचा प्रयत्न केला. तर या प्रश्नी येत्या मंगळवारी पालक व मुख्याध्यापक यांच्यात बैठक घेण्याचे ठरल्यानंतर पालक घरी गेले.
भाईंदर पश्चिमेच्या मॅक्सस मॉल मागील अप्पर तहसीलदार कार्यालय ते स्मशानभूमी या मार्गावर नारायणा ही इंग्रजी सिबीएससी बोर्डची शाळा आहे. सदर शाळेत शिकणाऱ्या अनेक मुलांच्या पालकांनी शाळेच्या आवारात मोठ्या संख्येने जमून शाळा व्यवस्थानने मनमानी व बेकायदा शुल्क आकारून ते वसुलीसाठी दबावतंत्र चालवले आहे, असा संताप व्यक्त केला.
मुलांना खेळण्यासाठी शाळेचे हक्काचे मैदान नाही. पुढील शैक्षणिक वर्षापासून अचानक गणवेश बदलण्याचा निर्णय घेत तो गणवेश शाळेतूनच घेण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचबरोबर संपूर्ण वर्षाची ५० टक्के फी ही पहिल्याच महिन्यात आगाऊ भरण्याची सक्ती शाळेने केल्याचा आरोप यावेळी पालकांनी केले.
पालकांनी शाळा व्यवस्थापनाला तसेच शिक्षण विभागासह महापालिका आयुक्त, अप्पर तहसीलदार आदींना याबाबत लेखी तक्रारी सुद्धा केल्या आहेत. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने पालकांनी शाळेत जमून मनमानी शुल्कवाढ व वसुलीविरुद्ध संताप व्यक्त करण्याची वेळ आणली गेली, असे पालकांनी बोलून दाखवले.
पोलिसांच्या मदतीने प्रशासनाशी चर्चा
पालकांना व्यवस्थापनाकडून कोणीच ठोस आश्वासन न मिळाल्याने भाईंदर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रसाद गोवले यांनी शाळा व्यवस्थापन व पालक यांच्यात बैठक बोलावून प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिली. त्यानंतर मंगळवारी शाळेच्या मुख्याध्यापिका या पालकांच्या प्रतिनिधींशी भेटून चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालकांना तसे आश्वासन मिळाल्यानंतर पालक घरी गेले.
शाळेचा फी प्रकार (रुपये)
गणवेश - ५,५०० ते ९,९००
पुस्तक - ५,५८५ ते ८,९२५
शाळेचा ॲप - ४ हजार रुपये
सावधान शुल्क - ३ हजार रुपये
ट्युशन फी - ८२000 ते १,८८000