ठाणे शहरातील खड्डेपुराण संपणार कधी? खड्डेमय रस्त्यांच्या स्मार्ट ठाण्याचे दुर्दैव

ठाणे शहरातील खड्डे पुराण संपता संपत नसल्याने वाहनचालकांच्या नाकीनऊ आले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात ठाणे शहरातील घोडबंदर रस्ता आणि ठाणे शहरातून जाणारा मुंबई-नाशिक महामार्ग खड्ड्यात जातो.
ठाणे शहरातील खड्डेपुराण संपणार कधी? खड्डेमय रस्त्यांच्या स्मार्ट ठाण्याचे दुर्दैव
दीपक कुरकुंडे
Published on

ठाणे शहरातील खड्डे पुराण संपता संपत नसल्याने वाहनचालकांच्या नाकीनऊ आले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात ठाणे शहरातील घोडबंदर रस्ता आणि ठाणे शहरातून जाणारा मुंबई-नाशिक महामार्ग खड्ड्यात जातो. नशिक महामार्गाची पावसाला सुरुवात झाल्यापासूनच दुरवस्था होत असल्याचे चित्र प्रत्येक पावसात पहावयास मिळत असते. खारेगाव टोलनाक्यापासून थेट कसारापर्यंत या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून या महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडीला नेहमीच सामोरे जावे लागत असल्यामुळे याचा फटका ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांना बसत असल्याचे दिसून येते. दररोज होणाऱ्या वाहतूकोंडीमुळे अखेर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई-नाशिक महामार्गाची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर आपल्या अधिकाऱ्यांचा फौजफाटा घेऊन उतरावे लागले.

ठाण्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेला घोडबंदर रस्ता ठाणेकरांसाठी दररोजचे दुखणे ठरत आहे. या रस्त्यांवर असलेले खड्डे वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. छोटे-मोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून या रोडवरील वाहतुकीचा सर्वाधिक फटका हा शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना बसत आहे. त्याचप्रमाणे कापूरबावडी आणि माजिवडा या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे सर्वाधिक अपघात होत आहेत. घोडबंदर रस्त्यावरील सेवा रस्त्यांची देखील चाळण झाली आहे. प्रवासी आणि पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन खड्ड्यातून रस्ता शोधत आपला प्रवास करावा लागत आहे.

ठाणे शहराप्रमाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी देखील तीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांना पावसाळ्यात खड्ड्यांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. या खड्ड्यांमुळे अनेक जणांना गंभीर दुखापती, वाहनांची हानी इतकेच काय तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. खड्डे जीवघेणा ठरतो, मोठा अपघात होतो तेव्हा प्रशासन खडबडून जागे होते. मात्र सदर घटनेस रस्ता बांधणारा ठेकेदार, महापालिका-नगरपालिका येथील अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हेच मुख्यत्वेकरून कारणीभूत असतात याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो. आतंकवादी आक्रमणात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपेक्षाही रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचे म्हटले जात आहे.

खड्डे भरताना डांबरमिश्रित खडीच टाकली जाते. त्यामुळे ते परत उखडतात आणि मूळ खड्ड्यांची समस्या तशीच राहते. शासनाकडे तर रस्ते बांधकाम आणि त्यांची डागडुजी यांसाठी बांधकाम विभाग असतो. या विभागात काम करणाऱ्या अभियंत्यांना बांधकाम केलेला रस्ता किती वर्षे टिकू शकेल याबद्दल महिती असते. जोरदार पावसाचा रस्त्यांवर कितपत परिणाम होऊ शकतो, याचा त्यांना अभ्यास असतो असे असले तरी शहरांत केवळ ६ मासांतच त्याच्या दुरुस्तीवर परत खर्च करावा लागतो. पावसाळ्यातील पाण्यामुळे रस्त्यावरील ‘हायड्रोकार्बन’ उडून जाते त्यामुळे रस्त्यांना खड्डे पडतात. पावसाचा जोर अधिक असेल, तर खड्डे वाढतात. यासाठी प्रत्येक वेळी रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा तत्काळ होणे अपेक्षित आणि आवश्यक असते; मात्र बहुतांश रस्त्यांवर पावसाळ्यातील पाणी साचून राहते आणि रस्ते लवकर खराब होतात.

ठाण्यातील घडामोडींवर राज्याचे लक्ष

ठाणे शहर आणि जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्षेत्र असल्याने ठाण्यात काय घडते याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. स्मार्ट सिटी म्हणून ठाणे शहराचा उल्लेख केला जातो आणि दुसरीकडे चांगल्या रस्त्यांपासून अनेक शहरे, गावे वंचित असून त्याकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटीची संकल्पनेसाठी प्रयत्न होत आहे, यापेक्षा मोठे ठाणे जिल्ह्याचे दुर्दैव ते कोणते. पावसाची चाहूल लागताच ठाणे शहर आणि आजूबाजूच्या लगतच्या शहरातील रस्त्यांची चाळण झालेली पहायला मिळते.

प्रत्येक वर्षी त्याच रस्त्यांसाठी भरघोस निधी

प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू होण्याआधी शहरात खडीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण अशा प्रकारच्या रस्त्याच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र एवढे करूनही रस्त्यांची स्थिती जैसे थे अशी परिस्थिती दिसत असल्यामुळे ‘हे पैसे नेमके कुणाच्या खिशात जातात हा यक्षप्रश्न आहे. ठाणे महापालिका, एमएमआरडीएकडून कोट्यवधी रुपये खर्च करून देखील शहरातील रस्ते थोड्याशा पावसात मान टाकतात. दरवर्षी महापालिका रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी विशेष निधी खर्च करते, त्याचप्रमाणे पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीसाठी अधिक निधीची तरतूद करत असते. मात्र प्रत्येक पावसात त्याच रस्त्यांसाठी हा निधी उभा केला जातो.

टक्केवारीमुळे रस्त्यांची गुणवत्ता घसरली

रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास किमान ३० टक्के रक्कम अधिकारी-पदाधिकारी यांच्या झोळीत टाकावी लागते. त्यामुळे उर्वरित ७० टक्के निधीचा वापर करून त्याला रस्ता बांधावा लागतो. हे आतागुपित राहिलेले नाही त्याचा परिणाम दर्जावर होतो. हे सर्व संगनमताने चालत असल्याने रस्ता बांधल्यावर खड्डे पडले तर ती जबाबदारी कोणाची हा प्रश्न कायम आहे. भ्रष्टाचारी अधिकारी आणि हलगर्जी करणारे ठेकेदार यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत खड्ड्यांची समस्या दरवर्षी पावसाळ्यात डोकेवर काढतच राहणार यात संशय नाही.

logo
marathi.freepressjournal.in