पीपीपीच्या नवीन प्रस्तावाने परिवहनचा घोर वाढणार

प्रदूषण कमी करण्यासाठी १०० इलेक्ट्रिक बसेस पीपीपी पध्दतीने चालवण्याचे टेंडर पाच वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले होते
पीपीपीच्या नवीन प्रस्तावाने परिवहनचा घोर वाढणार

महापालिकेची परिवहन सेवा सुरुवातीपासून तोट्यात सुरू आहे. परिवहन सेवा चालवण्यासाठी महापालिका प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान द्यावे लागत आहे. हा तोटा टाळण्यासाठी परिवहन सेवाच खाजगी उद्योजकांच्या गळ्यात मारण्याच्या हालचाली गेल्याकाही वर्षापासून सुरू आहेत. याच अंतर्गत ठाणे शहरात बॅटरीवर चालणाऱ्या इलेकि्ट्रक बसेस धावणार असल्याचे गेल्या काही वर्षांपासून सांगण्यात येत आहे. मात्र पीपीपी तत्वावर ज्या १०० बसेस येणार होत्या त्या पुरवण्यासाठी ठेकेदाराने हात वर केलेले असल्याने तो प्रस्ताव जवळपास रद्द झाला असल्याचे उघड झाले आहे. तर पुन्हा एकदा पीपीपी तत्वावर १२३ इलेकि्ट्रक बसेस घेण्यासाठी परिवहन सेवेने नवा प्रस्ताव पुढे केला असून व्यवसाय होवो न होवो ठेकेदाराला ठराविक रक्कम परिवहनला द्यावी लागणार असल्याने परिवहन प्रशासनाचा घोर वाढणार आहे.

शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी १०० इलेक्ट्रिक बसेस पीपीपी पध्दतीने चालवण्याचे टेंडर पाच वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले होते. इलेकि्ट्रक बसेसचा सर्व खर्च ठेकेदार कंपनी करणार होती. पार्किंग, बसथांबा, चार्जिंग स्टेशन यासाठी लागणारी जागा महापालिका ठेकेदार कंपनीला विनामुल्य देणार होती. तिकीटापासून मिळणारे सर्व उत्पन्न ठेकेदाराला मिळणार होते.

या बसेसमुळे पालिकेला परिवहन सेवेच्या बसेसवर जो तोटा होतो, तो तोटा या बसेसमुळे कमी होऊ शकतो असा दावा पालिकेकडून करण्यात येत होता. या बसेससाठी पालिकेला कोणताही आर्थिक भार उचलावा लागणार नव्हता. या बसच्या व्यवस्थापनासाठी वर्षाला एका बसमागे १ लाख २० हजार रुपये ठेकेदार कंपनीकडून पालिकेला मिळणार होते. या बसगाड्यांचे तिकीटही अन्य टीएमटी बसप्रमाणेच असणार होते. याशिवाय या बसमध्ये वातानुकूलीत प्रवासाचा अनुभव ठाणेकरांना मिळणार होता. मात्र ठेकेदाराने माघार घेतल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे.

दुसरीकडे पीपीपीचा पहिला प्रस्ताव गुंडाळला गेला असताना पीपीपी तत्वावर नव्याने ८१ बसेस घेण्यासाठी परिवहन सेवेने नवी निविदा काही महिन्यांपूर्वी काढण्यात आली होती.

यात बसेस ठेकेदार पुरवणार असला तरी चालक आणि वाहक मात्र परिवहन सेवेचे असणार होते. तो प्रस्तावही अद्याप पूर्णत्वास आलेला नसताना आता पीपीपीवर १२३ बसेस घेण्याचा नवा प्रस्ताव पुढे आला आहे. ऑलेक्ट्रा ग्रिनटेक आणि इवे ट्रान्स या अनुक्रमे उत्पादक आणि परिचालन करणाऱ्या कंपन्यामार्फत बसेस चालवल्या जाणार आहेत. त्यासाठी ठराविक मार्ग या कंपनीला देण्यात येणार असून त्यासाठी वाहक हे परिवहनाचे असणार आहेत तर चालक मात्र ठेकेदार कंपनीचे असणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in