पालिका शाळेतील ४५ शिक्षकांना वेतनश्रेणी लागू

मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाने शिक्षण विभागाने सदर बिंदुनामावली मंजूर करून घेतली व सेवाज्येष्ठतेनुसार ४ शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात सेवाज्येष्ठतेनुसार ८ शिक्षकांना निवड वेतनश्रेणी व १२ शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करून लागू करण्यात आली.
पालिका शाळेतील ४५ शिक्षकांना वेतनश्रेणी लागू

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या शाळांमधील पात्र असलेल्या सर्व ४५ शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. तर सेवा ज्येष्ठतेनुसार ४ शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कु.च.न.प. शाळा व शिक्षकांच्या सर्व वित्तृलब्धी मंजूर करण्यात आल्या असून त्यांचा लाभ शाळा व शिक्षकांना झाला असल्याची माहिती उपमुख्याधिकारी विलास जड्ये यांनी दिली आहे.

वित्तृलब्धी मंजूर करण्यात आल्यानंतर सर्व शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करून सर्वप्रथम वेतन आयोगाच्या फरकाचे ४ हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जे शिक्षक वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीसाठी पात्र आहेत. अशा सर्व शिक्षकांचे प्रस्ताव तयार करून त्यातील त्रुटी प्रशासनाकडून दूर करण्यात आल्या व आजपर्यंत पात्र असलेल्या सर्व ४५ शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात आली. यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे फक्त प्रस्ताव सादर न करता प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः जातीने वरिष्ठ कार्यालयात उपस्थित राहून सदर प्रस्ताव मंजूर करून घेतले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेकडून शाळा नगरपरिषदेकडे वर्ग होऊन बरीच वर्षं होऊन गेली. परंतु बिंदुनामावली मंजूर झाली नव्हती.

मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाने शिक्षण विभागाने सदर बिंदुनामावली मंजूर करून घेतली व सेवाज्येष्ठतेनुसार ४ शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात सेवाज्येष्ठतेनुसार ८ शिक्षकांना निवड वेतनश्रेणी व १२ शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करून लागू करण्यात आली. तसेच मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी जिल्हा परिषदेतून बदली होऊन कु.ब.न.प.मध्ये हजर झालेल्या शिक्षकांना कायम प्रमाणपत्र प्रदान करून दिले. त्यामुळे सर्व शिक्षकांनी मुख्याधिकारी व प्रशासन अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे आभार मानले आहेत.

पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या मराठी माध्यमासाठी ५ शिक्षक व उर्दू माध्यमासाठी ६ शिक्षकांना कुळगाव- बदलापूर नगर परिषदेमध्ये शिक्षण विभागात नियुक्ती देण्यात आली व त्याची अंमलबजावणी म्हणून तात्काळ सदर निवड झालेल्या शिक्षकांना शाळांमध्ये हजर करून घेतले आहे. फक्त कुळगाव- बदलापूर नगर परिषदेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, याचे सर्व श्रेय मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि प्रशासन अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग यांनाच आहे. - विलास जड्ये

शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावला

कुळगाव-बदलापूर नगरपरिषद शिक्षण विभागाने विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून सर्व शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. गेल्या १० वर्षांत वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाने कु.ब.न.प.तील शिक्षकांनी शाळांचे पट वाढविले आहेत, त्यातील काही शाळांचे पट तर ५०० च्या वर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री, माझी शाळा सुंदर शाळा कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात कु.ब.न.प. पर्यावरणपूरक शाळा क्र. १५ एरंजाड या शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावून रु. ५ लाख पारितोषिक मिळवले आहे. त्याचप्रमाणे न.पा.ची कुळगांव शाळा पी.एम. श्री शाळा व कुळगांव उर्दू शाळा आदर्श शाळा म्हणून निवडण्यात आली आहे. शिक्षण विभागाचा हा आलेख उंचावण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी नेहमीच पाठिंबा व प्रोत्साहन दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in