परंपरागत वीट बनवणारे कारागीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी बांधवांची दरवर्षीप्रमाणे यंदाही अॅडव्हान्स बुकींग सुरू झाली आहे. संपुर्ण राज्यात मातीच्या वीटांना प्रचंड मागणी आहे, परंतु वीट बनवणारा कारागीर हा फक्त आदिवासी बांधवच असल्याचे आजही पहावयास मिळत आहे.
स्वातंत्र्यानंतर आपल्या शेतातील माती पाण्यात मळून त्यांची वीट बनवण्याचा व्यवसाय खेडेगावात नदीपात्रात जंगलात सुरू झाला. आज हाच व्यवसाय कोटीची उलाढाल करत आहे. त्यावर हजारो आदिवासी बांधव आजही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. गेल्या तीस वर्षापुर्वी एक वीट बनवण्यासाठी २५ पैसे लागत होते. त्यावेळी वीट विक्री सातशे पासुन ते हजार रुपयापर्यंत होत होती. मात्र वाढती महागार्इ आणि कारागिराची कमतरता यामुळे एक वीट बनवण्यासाठी एक ते दोन रूपये दिले जातात. ही बनवलेली मातीची एक वीट बाजारात व्यापारीवर्ग आठ ते दहा रुपयाला विकत आहे. म्हणजे सात हजार ते दहा हजारावर संपुर्ण वीट विक्री केली जात आहे.
वीटभट्टीवर रोजंदारी म्हणजे वेठबिगारीच असते. संपुर्ण कुटुंब पावसाळयात सहा महिने वीटभट्टी चालक, मालकाकडून अॅडव्हान्स घेवून आपले गौरीगणपती सण साजरे करत असतात. संपुर्ण पावसाळयात याच पैशावर उर्धारनिर्वाह करतात. दसरा सण झाल्यावर पुन्हा कारागीर आपल्या कुटुंबासह लहानमुलांना घेवून वीटभट्टीवर कामासाठी रूजू होतात. मात्र यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची समस्या आजही गंभीरबाब बनली आहे.
रानावनात वीटभट्टयावर काम करणाऱ्या आदिवासी कुटुंबीयाच्या मुलांना शिक्षण आरोग्य सुविधा मिळत नाहीत. वीटभट्टीचा मालक महसुल तहसीलदाराला वर्षाला वीस किंवा पन्नास हजाराची माती उत्खन्न रॉयल्टी भरून देत असतात. एका वर्षात आदिवासी कारागिराकडून एक कोटीपासुन दहा कोटीपर्यंत वीटा बनवून घेतात. मात्र या कारागिरांना कोणत्याही प्रकारची सुखसुविधा मिळत नसते. उन्हाळा, हिवाळयात ही कारागीर कापडाच्या झोपडयांमध्ये आपले उदंड आयुष्य घालवत असतात. स्थानिकांना रोजगार नाही, शिक्षण घेतलेल्यांना नोकऱ्या नाहीत, स्थानिक कारखान्यामध्ये परप्रांतीयांची भरती करून तेथे ठेकेदारी सुरू आहे.
मुरबाड तालुक्यात टोकावडा मोरोशी माळशेज घाट डोंगर दऱ्याखोऱ्यात आदिवासी वस्ती ६० टक्के आहे. त्यांना पावसाळ्यात शेती करून कडधान्य, भाजीपाला आदी पिके घेता येतात. उन्हाळयात शेतीला पुरक पाणी नसल्याने रानावनातील आंबे, जांभळे, करवंदे, आवळा, कंदमुळे, रानभाज्या पाने, औषधी जडीबुटी हाच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे.