शेजाऱ्याला चिडवणे चिमुकल्याच्या जीवावर बेतले; अल्पवयीन मुलाच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी तिघांना अटक

गोरेगाव येथे राहणाऱ्या नऊ वर्षीय इबादने सफुआन याला चिडवल्याचा राग मनात ठेवून सफुआन तसेच सलमान व अब्दुल्ला या तिघांनी दोन महिन्यांपासून त्याला मारण्याचा कट रचला होता, अशीही माहिती पोलीस तपासात पुढे आली असल्याचे गोविंद पाटील यांनी स्पष्ट केले.
शेजाऱ्याला चिडवणे चिमुकल्याच्या जीवावर बेतले; अल्पवयीन मुलाच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी तिघांना अटक

बदलापूर : बदलापूरजवळील गोरेगाव येथे नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली आहे. चिडवल्याच्या क्षुल्लक कारणावरून या चिमुकल्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासांत समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे सफुआन मौलवी, सलमान मौलवी व अब्दुल्ला मौलवी अशी हत्या करणाऱ्या तिघांची नावे आहेत. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि गोविंद पाटील यांनी दिली.

गोरेगाव येथे राहणाऱ्या नऊ वर्षीय इबादने सफुआन याला चिडवल्याचा राग मनात ठेवून सफुआन तसेच सलमान व अब्दुल्ला या तिघांनी दोन महिन्यांपासून त्याला मारण्याचा कट रचला होता, अशीही माहिती पोलीस तपासात पुढे आली असल्याचे गोविंद पाटील यांनी स्पष्ट केले.

बदलापूरजवळील गोरेगाव येथे राहणारा इबाद बुबरे हा ९ वर्षांचा मुलगा रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाला. तो कुठेतरी खेळत असेल असे वाटल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला; मात्र खूप शोधाशोध करूनही त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. याचदरम्यान एका इसमाने फोन करून इबादच्या कुटुंबीयांकडे खंडणीची मागणी केली. त्यामुळे इबादच्या कुटुंबीयांनी कुळगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला.

इबादचा शोध घेत असताना त्याच्या घराजवळील एका घराच्या मागे इबादचा मृतदेह एका गोणीत भरून त्यावर लाकडे रचून ठेवण्यात आली असल्याचे आढळून आले. त्यानंतर तपासाला अधिक वेग देत काही तासांतच पोलिसांनी मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी स्वतः दोन दिवसांपासून या परिसरात तळ ठोकून होते.

logo
marathi.freepressjournal.in