
ठाणे : सध्या भजीपाल्यासह लाल सुक्या मिरचीच्या दरात किलोमागे १०० ते २०० रुपयांनी दर घसरण झाल्याने घाऊक बाजारात लाल मिरच्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मात्र लाल मसाल्यासाठी लागणाऱ्या गरम मसाल्याच्या पदार्थांनी भाव खाल्ल्याचे दिसून येत असल्यामुळे मसाला तयार होण्याआधीच त्याचा ठसका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
फेब्रुवारी अखेरीस आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारपेठेत विक्रीसाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातील मिरच्यांबरोबरच महाराष्ट्रातील सोलापूर, नंदुरबार येथील रेशीम पट्टी, कोल्हापूर येथील शंकेश्वरी जातीच्या तिखट लाल लवंगी मिरची आदी मिरच्या, मसाले दाखल झाल्या आहेत. लाल तिखट मिरच्या खरेदी करण्यासाठी महिला ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या मागील महम्द अली रोडवरील मसाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शंकेश्वरीचा अर्थात लवंगी मिरचीचा भाव यंदा ३०० ते ३५० दरात किरकोळ दराने बाजारात विक्रीसाठी असल्याचे घाऊक व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान घरगुती मसाले तयार करण्यासाठी लागणारे चांगल्या प्रतीचे धणे, जिरे, शहाजिरे, दगडफूल, लवंग, काळीमिरी, खसखस यांचे भाव यंदा वधारले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
६०० ते ७०० रुपये आर्थिक भुर्दंड
गुजरातवरून येणाऱ्या जिऱ्याचा भाव ४०० रुपये किलो, धने १५० ते २०० रुपये तर मसाल्यात वापरले जाणारे दगड फूल मागील वर्षीपेक्षा १५० रुपयाने महागले असून ६०० रुपये दराने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली. तर काळी मिरी आणि लवंगसह ४०० ते ५०० रुपये किलोने विक्रीस असल्याने मिरचीचा ठसका कमी झाला तरी गरम मसाल्यासाठी किलोमागे ६०० ते ७०० रुपये मोजावे लागणार आहेत.