युवतीला फरफटत नेणारा रिक्षाचालक गजाआड

या प्रकरणाची तक्रार दाखल होताच पोलिसांच्या तपासाला वेग आला; मात्र रिक्षाचा नंबर सापडत नसल्याने पुन्हा पोलीस अडचणीत आले
युवतीला फरफटत नेणारा रिक्षाचालक गजाआड

ठाणे स्टेशन परिसरात शुक्रवारी युवतीचा विनयभंग करून फरफटत नेणारा रिक्षाचालक आरोपी कटिकावाला उर्फ राजू अब्बाची विसमनेलु (३६) रा. गणेश नगर चाळ, रूम नं ६६, दिघा, नवी मुंबई याला ठाणे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाची तक्रार दाखल होताच पोलिसांच्या तपासाला वेग आला; मात्र रिक्षाचा नंबर सापडत नसल्याने पुन्हा पोलीस अडचणीत आले. ठाणे नगर पोलिसांचे तीन पथके विविध आसपासच्या विभागात रिक्षाचालकाबाबत चौकशी करीत होते. केवळ सीसीटीव्ही, युवतीने केलेले आरोपीचे वर्णन आणि रिक्षाच्या मागे लावण्यात आलेला स्टीलचे गार्ड याच धागेदोऱ्यांवर पोलीस तपास करीत होते. ठाण्याच्या आसपास असलेल्या दिघा परिसरात पोलीस पथक पोहोचले. दरम्यान, रात्रीच्या वेळी रिक्षा पार्किंग केलेल्या होत्या, त्या रिक्षा तपासण्यात येत होत्या. पार्किंग रिक्षामध्ये एक रिक्षा स्टीलचा गार्ड असलेली पोलिसांना दिसली.

आसपासच्या लोकांना विचारणा केल्यानंतर सदर रिक्षा राजू याची असल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान, तरुणीने केलेले वर्णन आणि स्थानिक लोकांनी केलेले वर्णन हे साम्य आढळल्याने दिघ्यांच्या गणेश नगरमध्ये पहाटेच पोलिसांनी आरोपी कटिकावाला उर्फ राजू अब्बाची विसमनेलु (३६) याला अटक केली. कुठलाही धागादोरा नसताना अवघ्या २४ तासांत आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले.

याप्रकरणी संशयित आरोपी राजूने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in