सेना शाखेत ध्वजारोहण कुणी करायचे यावरून शिंदे-ठाकरे गट आमने सामने

शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला मध्यरात्री झेंडा फडकावण्याची परंपरा आहे
सेना शाखेत ध्वजारोहण कुणी करायचे यावरून  शिंदे-ठाकरे गट आमने सामने

शिवसेनेत उभी फूट पाडून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. जिल्ह्यावर शिंदे यांचे गेली कित्येक वर्ष एकहाती नेतृत्व असल्याने बहुतांशी महापालिकेतील, नगरपालिकातील नगरसेवक आणि महत्वाचे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले. तर ठाण्याचे खासदार राजन विचारे हे मात्र सुरवातीपासून मातोश्रीच्या संपर्कात होते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या शिवसेना प्रतोदपदी त्यांची नियुक्ती केली आहे. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करत एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे या दोन गटात सत्तासंघर्ष सुरु आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना शिवसेनेच्या मुख्य शाखेत होणारे ध्वजारोहण कुणी करायचे यावरूनही हे दोन गट आमने सामने आले असून हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला मध्यरात्री झेंडा फडकावण्याची परंपरा आहे. गेली कित्येक दशके ही परंपरा सुरू आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेली ही परंपरा,आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी करत भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन केले असून ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. बहुतांशी निष्ठावंत शिवसैनिक मात्र अजूनही ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत. बऱ्याच शाखाही शिंदे गटाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक शिवसैनिकांनी विरोध केल्याने चंदनवाडी शाखा, जिल्हा मुख्य शाखा अद्यापही निष्ठावंत शिवसैनिकांच्या ताब्यात आहेत. दरम्यान यंदा मुख्यमंत्री असले तरी ठाण्यात येऊन ते ध्वजारोहण करणार असल्याने जर ठाकरे गटाचे शिवसैनिकही ध्वजारोहणाचा आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे वाटल्याने पोलिसांनी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह ठाकरे गटाच्या बऱ्याच शिवसैनिकांना नौपाडा पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत. विचारे आणि दिघे यांनी आपल्या समर्थकांसह नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना जाब विचारला, आम्ही ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारच अशी भूमिका त्यांनी घेतली.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात राजकारण करणे चुकीचे - केदार दिघे

ध्वजरोहणाची परंपरा आनंद दिघे यांनी सुरू केली, त्यासाठी आम्ही जाणार आहोत, कितीही नोटिसा द्या आम्ही उपस्थित राहणार. झेंडा वंदन कार्यक्रमात असे राजकरण करणे ही निंदनीय बाब आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in