उपनगरीय रेल्वेचा वेग वाढला

रेल्वे क्रॉसिंगची समस्या कायमस्वरूपी दूर झाली असून काही प्रमाणात उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास सुरवात झाली आहे
उपनगरीय रेल्वेचा वेग वाढला

गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र त्या प्रमाणात रेल्वेच्या सुविधा आणि लोकल गाड्या यांच्यात वाढ होत नसल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून पहायला मिळत होते. काही ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन प्रवाशांचे बळी जात होते. मात्र आता मध्य रेल्वेची पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाली असल्याने लोकल फेऱ्यांची संख्या ३६ ने वाढली आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांचा वेगही वाढला असून प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होऊ लागली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका मिळू लागल्या असल्याने रेल्वे क्रॉसिंगची समस्या कायमस्वरूपी दूर झाली असून काही प्रमाणात उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास सुरवात झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातून उपनगरीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात असतात आणि रेल्वेला वर्षाला हजारो कोटी रूपयांचा महसूल मिळवून देतात. मात्र या प्रवाशांच्या नशिबी सुखकारक प्रवास कधी येत नाही. त्यामुळे या प्रवाशांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी काही विशेष सुविधा देण्यात येतील, रेल्वे लोकलमधे वाढ होईल असे अपेक्षित होते परंतू भाजप प्राणित सरकारच्या आठ वर्षाच्या कार्यकाळातही रेल्वे बजेट मध्येही विशेष काही बाहेर आलेले अद्याप तरी दिसलेले नाही यामुळे ठाणे जिल्ह्यातून मुंबई, कर्जत, कसारा,नवी मुंबई आणि पनवेलच्या दिशेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळण्याची प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून पाचवी आणि सहावी लाईन सुरु झाल्यापासून सुमारे ३६ लोकलच्या फेऱ्या वाढल्या असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळी प्रचंड गर्दी असते तेव्हाचा प्रवासपूर्वी पेक्षा काहीसा सुसह्य झाला आहे.

भारतीय रेल्वेच्या इतिहासात १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली. मात्र या ऐतिहासिक रेल्वे स्थानकात काही अमुलाग्र परिवर्तन व्हावे यासाठी गेली कित्येक दशके प्रयत्न झालेले नाहीत. २००९-१० च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाणे रेल्वेस्टेशनला आंतराष्ट्रीय दर्जा, वसई स्थानकात बहुउद्देशीय संकुल, बराचकाळ रेंगाळलेल्या डहाणू नाशिक रेल्वेच्या सर्व्हेक्षणाला मान्यता, कल्याण अहमदनगर रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण आदी महत्वाच्या घोषणा करत ठाणे जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरच्या दशकात नव्याने कोणतीही हालचाल झालेली नाही. दरम्यान ऐरोली एलिव्हेटेड मार्गाचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नसताना पाचवी आणि सहावी रेल्वे लाईनमुळे काही प्रमाणात तरी उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत झाली आहे. विशेष करुन सकाळच्या वेळी कामावर जाताना आणि संध्याकाळच्या वेळी घरी परतण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी लोकलमधे होत असते त्यादरम्यान दरवाजात उभे रहाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. रेल्वे लोकल मधील वाढलेली गर्दी पाहता येत्या काही दिवसात यावर ठोस उपाययोजना केली नाही तर परिस्थिती यापेक्षा भयावह होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वेचे अपघात वाढले

जस जसे नागरीकरण वाढू लागले त्याचप्रमाणे रेल्वे लोकलमध्ये देखिल गर्दी वाढू लागली आहे. त्याच प्रमाणात अपघातांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गावर दर दिवशी किमान ८ ते १० प्रवाशांचे बळी जात असल्याचे उघड झाले आहे. गेल्या दशकात रेल्वे अपघातात २७ हजार ३१२ प्रवाशांचे बळी गेले आहेत तर १७ हजार ३२५ प्रवासी अपघातात जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानकादरम्यान ठाणे खाडी परिसरात रेल्वेरुळ ओलांडताना प्रवाशांचा रेल्वे अपघातात अधिक होतात मुंब्रा, दिवा, कल्याण ते उल्हासनगर आणि अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा येथील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. खाली पडणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर दहा वर्षामध्ये घडलेल्या विविध अपघातांमध्ये तब्बल २७ हजार ३१२ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचे तसेच १७ हजार ३२५ प्रवाशांना जखमी व्हावे लागल्याची धक्कादायक गोष्ट दोन वर्षांपूर्वी माहितीच्या अधिकारात उघडकीस आली होती. ही आकडेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१९ दरम्यानची असून दररोज किमान ८ बळी जात असल्याने यातही गेल्या तीन वर्षात किमान ८ हजार ६४० बळी गेले असण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळ ओलंडताना, चालत्या लोकलमधून खांबाला धडकून, फलाट आणि लोकलच्या गॅपमध्ये अडकून, विद्युत तारेचा झटका लागुन, रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्यामुळे तसेच नैसर्गिक मृत्यूच्या घटनांमुळे सध्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीन्ही रेल्वे मार्गावर दर दिवशी किमान ८ ते १० प्रवाशांचा मृत्यू होत असल्याची नोंद विविध रेल्वे पोलीस ठाण्यात होत आहेत.

पाचव्या सहाव्या रेल्वेट्रॅकमुळे लोकलफेऱ्या वाढल्या

पाचव्या सहाव्या रेल्वे ट्रॅकमुळे लांबपल्ल्याच्या गाडयांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाली असताना पूर्वी उपनगरीय रेल्वे लोकलच्या १ हजार ७७४ फेऱ्या होत होत्या त्यात वाढ होऊन १ हजार ८११ झाल्या आहेत विशेष म्हणजे या फेऱ्या गर्दीच्या वेळेत वाढवण्यात आल्या असल्याने सध्या तरी सकाळी आणि संध्याकाळी होणारी गर्दी काहीशी कमी झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in