
कोरोनाचा कहर कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात स्वाईन फ्लूने हात पाय पसरायला सुरवात केली आहे. ठाण्यात २० जणांना स्वाईन फ्लू झाला असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ४०० जणांची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे, तर आतापर्यंत या रोगाने २ महिलांचे बळी घेतले असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र अद्यापतरी स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला नसल्याचे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.
स्वाइन फ्लू हा नियमित स्वरूपात आढळणारा एक श्वसनसंबंधी रोग आहे. हा रोग ए प्रकारच्या इफ्ल्युएन्झा व्हायरसमुळे होतो व डुकरांमध्ये याची साथ पसरणे सामान्य असते. लोकांना साधारणपणे स्वाइन फ्लू होत नाही पण माननाला याचा संसर्ग होऊ शकतो. स्वाइन फ्लूचे विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरल्याचे उदाहरणे आहेत, परंतु पूर्वी हे स्थित्यंतर सीमित होते व सहसा तीनपेक्षा जास्त लोकांपर्यंत हा रोग पसरत नव्हता, मात्र आता हा रोग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने नागरिकांनी याबाबत खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
स्वाइन फ्लूची चिन्हे आणि लक्षणे नेहमीच्या मानवी फ्लूसारखीच आहेत आणि त्यामध्ये खोकला, घसा बसणे किंवा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा ह्यांचा समावेश आहे. काही लोकांना स्वाइन फ्लू बरोबरच उलट्या आणि जुलाब झाल्याचे देखिल आढळले आहे. लोकांना स्वाइन फ्लू बरोबरच न्युमोनिया आणि श्वसनसंस्था निकामी होणे असेही रोग होतात आणि त्यात काहींचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. हंगामी फ्लूप्रमाणेच, स्वाइन फ्लूदेखील गंभीर रोगाचे स्वरूप घेऊ शकतो. प्रामुख्याने इंफ्लूएंझा झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्यातुन किंवा खोकण्यातुन फ्लूचा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. काही वेळा फ्लूचा विषाणू असलेल्या एखाद्या वस्तूला हात लावून तोच हात नाक किंवा तोंडाला लावल्याने देखिल संसर्ग होतो, असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, याच प्रकारे गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात स्वीडन फ्लूची सात वेगाने पसरू लागली असून फक्त ठाणे शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूची २० जणांना लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.