ठाणे : विधानसभेच्या निवडणुकीचे प्रचार युद्ध शिगेला पोहचले असताना ठाण्यात महायुतीतील घटक पक्षांतील कार्यकर्त्यांमधील नाराजीमुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने प्रचारात अलिप्त धोरण स्वीकारल्यानंतर कळवा-मुंब्र्यात देखील परतफेड म्हणून भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या प्रचारातून अंग काढून घेतले आहे.
कोणत्याही परिस्थितीत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्याच्या इराद्याने महायुती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असली तरी महायुतीच्या घटक पक्षांतील कार्यकर्त्यांमधील नाराजीचा फटका महायुतीला बसतो का? अशी शंका आता ठाण्यात उपस्थित होऊ लागली आहे. ठाणे शहरात याचा प्रत्यय येऊ लागला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नेते कोणती भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ठाणे शहर मतदारसंघातून तिसऱ्यांदा भाजपचे संजय केळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर हे इच्छुक होते. परंतु युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला आल्याने संजय भोईर हे नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे माजी महापौर शिंदे यांनी देखील महिला म्हणून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. असे असले तरी त्यांच्या नाराजीचे पडसाद प्रचारात उमटलेले दिसून येत आहेत. भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारात संजय भोईर आणि मीनाक्षी शिंदे यांचा सहभाग दिसून येत नाही. भाजपने संजय केळकर यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा संधी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटात या निर्णयबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत होती. ठाण्यात संजय केळकर यांच्या प्रचाराचा धडाका सुरू असताना शिंदे गटाचे नेते प्रचारात सहभाग घेत नसल्याने भाजपने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
ठाण्याची परतफेड कळव्यात!
दरम्यान भाजपने याची परतफेड म्हणून कळवा-मुंब्र्यात महायुतीच्या प्रचारातून अंग काढून घेतले आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्याशी त्यांचा सामना रंगणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्र्यात प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात नजीब मुल्ला यांचा वेळ जात आहे. कळवा-मुंब्र्यातील भाजप कार्यकर्त्यांनी संजय केळकर यांच्या प्रचारासाठी ठाण्यात धाव घेतल्याने कळव्यात नजीब मुल्ला यांची कोंडी झाली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या निवडणुकांच्या व्हॉट्सअॅपवर आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुतीला घटक पक्षांतील नाराजीचा फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वरिष्ठ नेत्यांनी या बाबत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य तो मार्ग न काढल्यास येत्या काळात ठाण्यात महायुतीतील अंतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.