ठाणे : सांस्कृतिक ठाणे शहरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. शहरात थरांची स्पर्धा, बक्षिसांची लयलूट, सिने कलाकारांची हजेरी आणि गोविंदांचा शिगेला पोहोचणारा उत्साह, असा थरांचा थरथराट दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील दहीहंडी उत्सवात पाहायला मिळणार आहे. मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील लहान-मोठ्या गोविंदा पथकांना ठाण्यातील बक्षिसांनी भरलेली हंडी नेहमीच खुणवत असते. त्यामुळे ठाण्यात दहीहंडी उत्सवात थरांचा थरार पहायला मिळतो. यासोबतच नऊ थरांचा विक्रम मोडून दहा थरांचा यशस्वी मनोरा कोणत्या गोविंदा
पथकाकडून रचला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सव आयोजकांकडून गोविंदा पथकांवर लाखोंच्या रकमांच्या बक्षिसांची उधळण केली जाणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरू करून साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तरुणाईची धूम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे.
मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. दिघेंनंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करून दिले.
ठाण्यात साडेचार हजार पोलीस तैनात
गोपाळकाला उत्सव काळात ठाण्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. त्यात ८ डीसीपी, १४ एसीपी, ८५ पोलीस निरीक्षक, २७५ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ३४०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. याशिवाय ५०० होमगार्ड, ४ एसआरपीच्या तुकड्या, क्यूआरटी पथक आदी फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात येणार असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच गोविंदा मंडळांना व दहीहंडी आयोजकांना काही नियम आखून दिले आहेत.
डीजे व साऊंड सिस्टीमचा आवाज नियमानुसार ६५ डेसीबलपर्यंत ठेवावा, वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी दहीहंडी बांधू नये, असे नियम घालून देण्यात आले आहेत. महिलांच्या छेडछाडीसारख्या प्रकारांना आळा बसावा म्हणून ठाणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. तरुणी व महिलांसोबत होणारे छेडछाडीचे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्भया, दामिनी आणि पोलीस दीदी असे विविध पथके दहीहंडीच्या दिवशी गस्तीवर असणार आहेत, तर आतापर्यंत २२ गुंडांना एनडीपीएस ॲक्टनुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ऐरोली सेक्टर-१५ मधील रस्ता बंद
ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ऐरोलीतील इच्छापूर्ती गणपती मंदिर चौकात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने दहीहंडीच्या दिवशी दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत मुंबईकडून दिवागांव सर्कल येथून
पटणी मार्गे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ऐरोली सेक्टर-१५ पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी जारी केली आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने दहीहंडीच्या दिवशी दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत मुंबईकडून दिवागांव सर्कल येथून पटणी मार्गे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ऐरोली सेक्टर-१५ पासून बंद ठेवली आहे. या कालावधीत मुंबईकडून दिवागांव सर्कलमार्गे पटणी ठाणेकडे जाणाऱ्या वाहनांना ठाणे-बेलापूर मार्गावरून अथवा स्वामी चौक येथून डाव्या बाजूने सेक्टर-१७ मधील पटणी मार्गे ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
जखमी गोविंदांना एक लाख
शासनाने दहीहंडी खेळाला साहसी क्रीडा प्रकाराचे स्थान दिल्याने याची प्रतिष्ठा आणखी वाढली आहे. जवळपास ६४ हजार गोविंदांनी विमा उतरवला आहे. राज्य सरकारकडून गोविंदांसाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करण्यात आले असून ७५ हजार गोविंदांचा विमा उतरवला जाणारा आहे. दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे तयार करतांना एखादी दुर्घटना किंवा दुर्घटना घडल्यास किंवा जखमी झालेल्यांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. सरकारी आदेशानुसार हात किंवा दोन्ही डोळे गमावणाऱ्या गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. एक हात, एक पाय किंवा डोळा गमावल्यास त्यांना ५ लाख तर दोन्ही हात, पाय किंवा डोळे गमावणाऱ्यांना १० लाखांच्या विम्याचा लाभ मिळणार आहे. अपघातात जखमी झालेल्या गोविंदांना उपचारासाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये मिळू शकणार आहेत.
मुख्यमंत्री दहीहंडी उत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे आणि कल्याण संपर्क प्रमुख खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात एकूण १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत. मंगळवारी होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्याला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, आठ थरांसाठी २१ हजारांचे रोख पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह तर सात थरांसाठी ११ हजार रुपये सहा थरांसाठी ६००० पाच थरांसाठी ५००० आणि चार थरांसाठी ३००० लावणाऱ्या गोविंदा पथकांना एकूण १ लाख ११ हजार एकशे एकरा रुपयांचे रोख पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
मानाची हंडी
टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षिसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षिसे रोख स्वरूपात देण्यात येऊ लागली. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १,००,०००/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे, तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १२,००० हजार, सहा थरांसाठी ८,००० हजार, पाच थरांसाठी ६,००० हजार, तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी ५००० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
नृत्य व संगीतमय जल्लोष
या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधुर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साऊंड तसेच नेत्रदीपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे.
श्रीकृष्णाच्या विचारांचा पथनाट्याद्वारे प्रसार
नवी मुंबई: भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्यांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत म्हणून स्वाध्याय परिवारातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशविदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. जन्माष्टमीनिमित्त सादर होणाऱ्या या पथनाट्यांचा हा प्रयोग गेली २२ वर्षे निरंतर सुरू आहे. विविध भाषांमधून ही पथनाट्ये या सप्ताहात २६ ऑगस्टपर्यंत सादर केली जाणार आहेत. नवी मुंबईत ४५ पथकांच्या माध्यमातून येत्या २६ ऑगस्टपर्यंत जवळपास ४०० पथनाट्ये विविध ठिकाणी साकारली जात असल्याचे स्वाध्याय सदस्य वैभव सोनटक्के यांनी सांगितले.