पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी द्या! पाणी न दिल्यास शेतकऱ्यांचा उठाव करण्याचा निर्णय

पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी येथे शेतकऱ्यांची संघर्ष समिती काम करीत होते.
पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी द्या! पाणी न दिल्यास शेतकऱ्यांचा उठाव करण्याचा निर्णय

कर्जत : तालुक्यातील रेल्वेपट्ट्यातील जमीन ओलिताखाली आणून परिसर हिरवागार करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाली भूतीवली लघुपाटबंधारे प्रकल्प साकारला आहे. या धरणाच्या जलाशयात गेल्या वीस वर्षांपासून पाणी साठून राहिले आहे; मात्र ते पाणी शेतीसाठी सोडले जात नाही. त्यामुळे आता शेतीसाठी पाणी जाणार असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी उठाव करण्याचा निर्णय घेतला असून, ग्रामपंचायतीमधून जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पाणीपुरवठा करण्याची मागणी असलेले ठराव एकत्र केले जात आहेत. धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यासाठी कालव्यांची कामे अर्धवट असल्याने शेतीसाठी पाणी देण्यात अडथळे येत आहेत.

कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात कोणतीही नदी नसल्याने या भागात सतत पाणीटंचाई असायची. त्यामुळे १९८२ साली तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे यांच्या प्रयत्नातून पाली भूतीवली येथे लघुपाटबंधारे प्रकल्प मंजूर झाला; मात्र त्यानंतर या धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम १९९६ मध्ये सुरू झाले. त्यावेळी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करून घेतली होती. परिसरातील पंधरा गावांमधील एक हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणू शकणाऱ्या या लघुपाटबंधारे धरण मध्ये २००४ मध्ये प्रत्यक्ष पाणी साठा झाला होता आणि त्यावेळी धरणातील त्या पाण्याचे जलपूजन तत्कलीन आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते; मात्र धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा झाला असताना धरणाचे पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यातून शेतीसाठी सोडले जावे यासाठी कळावे बांधण्यात आले नव्हते आणि त्यामुळे आजपर्यंत मागील वीस वर्षात दुबार शेती पंधरा गावातील शेतकऱ्यांना करता आलेली नाही.

पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी येथे शेतकऱ्यांची संघर्ष समिती काम करीत होते. त्या संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी सरपंच जवाहर देशमुख हे आज हयात नाहीत. त्यात कालव्यांची कामे गेली वीस वर्षांत पुढे सरकली नाहीत आणि त्यामुळे धरणाच्या पाण्यावर बिल्डर लॉबी पोसली जात आहे. त्यात शेती शिवाय तरणोपाय नाही यांची कल्पना सर्व तरुण वर्गाला अली आहे. त्यामुळे शासनाने कालव्यांची कामे पूर्ण करून शेतीसाठी या धरणाचे पाणी सोडण्यात यावे, यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. मागील दोन वर्षे शेतकरी या धरणाच्या अर्धवट असलेल्या कालव्यांच्या कामासाठी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे अर्ज निवेदने घेऊन जात होती. आमदार थोरवे यांनी देखील शासनाकडे कालव्यांची आणि धरणाची इतर कामे पूर्ण करण्यासाठी तब्ब्ल १५७ कोटींचा निधी वळविला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या धरणाच्या सांडव्याचं भिंतीचे तसेच मुख्य बांधाचे दगडी पिचिंगचे काम पाटबंधारे विभागाने सुरू केले आहे.

कायदेशीर लढाई लढण्याची तयारी

स्थानिक शेतकरी समाधानी नाहीत. त्यांनी पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळालेच पाहिजे, यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. धरणाचे पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यातून ज्या पाच ग्रामपंचायत हद्दीमधील शेत जमीन ओलिताखाली आणण्यासाठी जाणार आहे. त्या आसल, माणगावतर्फे वरेडी, उमरोली, चिंचवली, उकरूळ या सर्व ग्रामपंचायतींमधून पुन्हा एकदा ठराव घेऊन धरणाचे पाणी शेतीसाठी देण्यात यावे, यासाठी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे.

आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांना जमिनीमध्ये दुबार पीक घ्यायचे आहे. त्यासाठी आम्ही सर्व गावातील शेतकरी एकत्र येत आहोत. जे जुन्या शेतकऱ्यांनी स्वप्न बघितले होते, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तरुणांनी आता एकत्र येऊन पाठपुरावा सुरू केला आहे. कालव्यांची कामे लवकरात लवकर व्हावीत आणि या भागातील शेतीत पाणी दिसावे, यासाठी आमची धडपड सुरू आहे. - सचिन गायकवाड, शेतकरी

logo
marathi.freepressjournal.in