मेट्रो-४ प्रकल्प रखडला; वडाळा ते कासारवडवली तसेच पुढे गायमुखसाठी २०२५ उजाडणार

वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर आता रोज चार लाख प्रवासी प्रवास करतात. हाच मार्ग पुढे ठाणे शहरापर्यंत वाढवण्यात येत आहे. मेट्रोच्या वापराने रेल्वेच्या प्रवाशांची गर्दी कमी होईलच, पण मुंबईतील पश्चिम-पूर्व भाग या मेट्रो-४ ने जोडले जाणार आहेत.
मेट्रो-४ प्रकल्प रखडला; वडाळा ते कासारवडवली तसेच पुढे गायमुखसाठी २०२५ उजाडणार

ठाणे : वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला मेट्रो-४ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होत नसल्याने ठाणेकरांच्या त्रासात भर पडली आहे. हा प्रकल्प २०२४ रोजी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र आता प्रत्यक्षात हे काम पूर्ण करण्यासाठी २०२५ साल उजाडणार असल्याने आणखी दीड ते पावणे दोन वर्षे ठाणेकरांना मेट्रोच्या कामांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात आणि मुख्यमंत्र्यांचाच ड्रीम प्रकल्प असलेल्या प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे शहरातून जाणाऱ्या मेट्रोच्या कामाला पाहिजे तशी गती आलेली नाही. त्यामुळे वडाळा ते कासारवडवली तसेच पुढे गायमुखपर्यंत असलेल्या मेट्रो-४ साठी २०२५ साल उजाडण्याची शक्यता आहे. वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर आता रोज चार लाख प्रवासी प्रवास करतात. हाच मार्ग पुढे ठाणे शहरापर्यंत वाढवण्यात येत आहे. मेट्रोच्या वापराने रेल्वेच्या प्रवाशांची गर्दी कमी होईलच, पण मुंबईतील पश्चिम-पूर्व भाग या मेट्रो-४ ने जोडले जाणार आहेत. ठाणे शहरात रस्त्यावरील वाढत चाललेली वाहने डोकेदुखी ठरत चालली आहे. वाहतूककोंडीमुळे ठाणे शहराचा श्वास कोंडत चालला असताना मेट्रोच्या वापरामुळे ठाणे शहराच्या रस्त्यावर धावत असलेल्या वाहन संख्येत घट होऊन विषारी उत्सर्जनात देखील घट होऊन पर्यावरण संवर्धन देखील होणार आहे. मुंबईला ठाण्याशी मेट्रोने जोडण्यासाठी एमएमआरडीएने सुरुवातीला मेट्रो-४ प्रकल्प हाती घेतला होता. मूळ आराखड्यानुसार, ही मेट्रो रेल्वे वडाळा-कासारवडवली अशी धावणार होती. पण त्यानंतर मेट्रो-४चा मेट्रो-४ अ असा विस्तार करण्यात आला असून, गायमुखपर्यंत मेट्रो रेल्वे धावणार आहे.

मेट्रो प्रकल्प ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु २०२०मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे परराज्यातील मजूर त्यांच्या गावी निघून गेले. तसेच सार्वजनिक व्यवस्थेची कामे ठप्प झाली होती. ठेकेदारांकडून आडमुठे धोरण अवलंबले जात होते. मोघरपाडा येथे मेट्रो कारडेपोच्या कामांना स्थानिकांचा विरोध आहे. या विरोधातून मार्ग काढण्याचे धोरण एमएमआरडीएने स्वीकारले असले तरी कारडेपोचे काम अजूनही सुरू झालेले नाही. विविध तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या दोन्ही प्रकल्पांच्या कामाची मुदत उलटून गेली आहे.

आता डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) केला जात आहे. ठाणे शहरात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. मेट्रो मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यास रस्ते कोंडीमध्ये घट होण्याची शक्यता एमएमआरडीएकडून वर्तविली जात आहे. मेट्रो-४ मार्गिकेवरून दैनंदिन १२ लाख १३ हजार प्रवासी प्रवास करतील. तर मेट्रो-४ अ या मार्गिकेवरून दैनंदिन एक लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा एमएमआरडीने व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय टळणार असून ठाणे रेल्वे स्थानकात होणारी गर्दी काही प्रमाणात घटण्याची चिन्हे आहेत.

अंतर्गत मेट्रो प्रतीक्षेत

महापालिकेने १० हजार ४१२.६१ कोटी इतक्या रकमेचा डीपीआर तयार असून तो आपल्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. परंतु अद्याप केंद्र शासनाने मंजुरी न दिल्याने अंतर्गत मेट्रो प्रकल्प रखडला आहे.

वाहतूककोंडीसाठी मेट्रो चार आवश्यक

मुंबई मेट्रो ४ या नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प ३५ किलोमीटर जमिनीवरून जाणारा कॉरिडोर असणार आहे. त्यावर उत्तरेस कासारवडावली (ठाणे) पासून ३४ स्टेशन्स आहेत. याचा खर्च १४५०० कोटी रुपये असण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. ठाण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे

वाहतुकीशिवाय आज तरी स्वस्त आणि जलद पर्याय उपलब्ध नाही. दुसरीकडे ठाण्याचा भौगोलिक विस्तार वाढत असताना या शहराची लोकसंख्या देखील वाढत चालली आहे. वाढत्या लोकसंख्येला सामावून घेणारी सार्वजनिक परिवहन सेवा ही या शहरातील भविष्यातील प्रमुख गरज असून मेट्रो चार प्रकल्प हे त्याचे समर्पक उत्तर असणार आहे.

उपनगरांसाठी मेट्रो महत्त्वाची

ठाण्याची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूस लोकवस्ती विस्तारताना दिसत आहे. माजिवडा ते गायमुखपर्यंत आणि पुढे मीरा-भाईंदरपर्यंत असे नागरीकरण होताना दिसत आहे. ठाण्याला खेटून असलेली मुलुंड, भांडुप, नाहूर, कांजूर ही उपनगरे ही गेल्या काही वर्षांपासून कात टाकत असून दळणवळणासाठी पर्यायी व्यवस्थेची येथेही मोठी गरज निर्माण झाली आहे. उपनगरीय रेल्वे सेवेवर येणारा प्रवाशांचा भार लक्षात घेऊन वडाळ्यापासून ठाण्याच्या गायमुखपर्यंत येणारी मेट्रो ही या उपनगरांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. एका अर्थाने उपनगरीय रेल्वेस समांतर वाहतूक व्यवस्था म्हणूनही या मेट्रो व्यवस्थेकडे पाहिले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in