महापालिका निवडणूकीत दलबदलाला मोठी गती येण्याची शक्यता; भाजपचे नगरसेवक शिंदे गटात जाण्याची चर्चा

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता.
महापालिका निवडणूकीत दलबदलाला मोठी गती येण्याची शक्यता; भाजपचे नगरसेवक शिंदे गटात जाण्याची चर्चा

सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असे आदेश दिले असले तरी पावसाळ्यानंतर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली असल्याने महापालिका निवडणूक कधी होणार याबाबत सांशकता आहे. त्रिस्तरीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार की यातही बदल होणार यावरूनही तर्क वितर्क सुरु आहेत. दुसरीकडे शिवसेनेचा आमदारांचा मोठा गट घेऊन भाजपसोबत गेल्याने एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या गटाकडे तिकीट मिळवण्यासाठी सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता असून शहरातील राष्ट्रवादीचे आणि काही भाजपचे नगरसेवक शिंदे गटाकडे जाण्यासाठी उत्सुक असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. निवडणूक जाहीर होणारच दलबदलाला मोठी गती येण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता. नवी मुंबईत गणेश नाईक, संदीप नाईक, मीरा भाईंदर गिल्बर्ट मेंडोसा, कळवा मुंब्रा जितेंद्र आव्हाड, मुरबाड किसान कथोरे, कल्याण पूर्व अपक्ष गणपत गायकवाड आदी विधान सभेतील आमदार, कोकण पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे, ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचे वसंत डावखरे आणि राज्यपाल नियुक्त सुभाष भोईर कल्याणचे आप्पा शिंदे हे विधान परिषदेतील आमदार तर ठाण्याचे खासदार संजीव नाईक आणि शिवसेनेचे असले तरी राष्ट्रवादीसोबत गेलेले कल्याणचे खासदार आनद परांजपे अशी लोकांमधून निवडून आलेली मोठी फळी तर जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नवी मुंबई महापालिका, मिरा - भाईंदर महापालिका आदी ठिकाणी सत्ता यामुळे जिल्ह्यावर राष्ट्रवादी एकहाती सत्ता होती. मात्र २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेपासून राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लागला. वसंत डावखरे यांचा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांनी पराभव केला तर वसंत डावखरे यांच्या अकाली मृत्यूनंतर निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजपमधून लढवली आणि ते निवडूनही आले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याणमधून तर २०१९ च्या निवडणुकीत ठाण्यातून राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचा पराभव झाला. किसन कथोरे दोनवेळा भाजपातून आमदार झाले, कपिल पाटील भिवंडीतून भाजपमधून दुसऱ्यांदा विजयी झाले आणि आता त्यांची वर्णी केंद्रीय राज्यमंत्रीपद लागली आहे. सुभाष भोईर २०१४ साली शिवसेनेचे आमदार झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापण्यात आले. गणेश नाईक भाजपमधून विजयी झाले अशा प्रकारे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा जिल्ह्यात चांगले यश मिळवू शकते अशी चर्चा असताना कळवा मुंब्र्यातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, शहापूरातून शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले दौलत दरोडा हे विजयी झाले आणि महाविकास आघाडीची सत्ता राज्यावर येताच जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद वाढू लागली असल्याचे चित्र असताना गेल्या महिन्यात राज्यात सत्तांन्तर झाले आणि शिवसेनेत मोठी फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्याने जिल्ह्यात त्यांच्या गटाकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा ओढा वाढला आहे.

भाजपचा बार फुसका

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या सोबत ठाण्यातील राष्ट्रवादीचे किमान १० नगरसेवक, मोठ्या प्रमाणात वरिष्ठ पदाधिकारी, जिल्ह्यातील इतर महापालिका, नगरपालिकेतील नगरसेवक, जिल्ह्यातील बहुतांशी पदाधीकारी भाजपमध्ये प्रवेश करणारे असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यावेळी काही अपवाद वगळता राष्ट्रवादीला मोठी हानी झाली नाही. आताही शिवसेनेच्या फुटीर गटाबरोबर भाजप राज्यात सत्तेत असली तरी ठाण्यात शिंदे गटाचा दबदबा असल्याने सत्तांतर झाले असले तरी किमान ठाण्यात तरी भाजपला फारसा फायदा होण्याची शक्यता कमी आहे.

एकनाथ शिंदे गटाकडे वाढता कल

ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व असल्याने निवडणुकीपूर्वी शिंदे गटाकडे मोठी रांग लागण्याची शक्यता आहे. तसेच नवीमुबंईत गेल्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने चांगली लढत दिली होती तिथूनही नगरसेवकांचा वाढता कल शिंदे गटाकडे असल्याने येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटाला मोठे यश मिळू शकते अशी चर्चा आहे. त्याचमूळे राष्ट्रवादीचे शहरातील चार तर भाजपचे काही नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in