खासगी टँकरवाल्यांना पाणी गुणवत्ता अहवाल सादर करण्याचे पालिकेचे आदेश

खासगी टँकरचालकांकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा दूषित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने टँकरमालकांना पुरवठा करत असलेल्या पाण्याचा गुणवत्ता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महापालिकेने टँकरमालकांना नोटिसा पाठवल्या आहेत
खासगी टँकरवाल्यांना पाणी गुणवत्ता 
अहवाल सादर करण्याचे पालिकेचे आदेश

भाईंदर : मीरा-भाईंदर शहराराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नेहमीच पाणी समस्या जाणवत आहे. परिणामी रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने खासगी टँकर चालकांवर अवलंबून राहावे लागते.

खासगी टँकरचालकांकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा दूषित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने टँकरमालकांना पुरवठा करत असलेल्या पाण्याचा गुणवत्ता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महापालिकेने टँकरमालकांना नोटिसा पाठवल्या आहेत. नोटिसा पाठवल्यानंतरही एकाही टँकरमालकाने महापालिकेला अहवाल सादर केलेला नाही.

मीरा-भाईंदर शहराला अनेक वर्षांपासून शहरातील नागरीकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांना खाजगी टँकरचालकांवर अवलंबून राहावे लागते. काही खासगी टँकरमालकांच्या स्वतःच्या विहिरी, बोअरवेल अथवा तलाव आहेत तर काही टँकरचालक हे दुसऱ्यावर अवलंबून आहेत. हे टँकरचालक या विहिरीतून किंवा बोअवेल मधून पाणी भरून नागरिकांच्या मागणीनुसार पुरवठा करतात. हे खासगी टँकरमालक पाणी पुरवत असताना त्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे, ते पाणी पिण्यायोग्य आहे का, याची कोणतीही तपासणी केलेली नसते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे शहरातील खासगी टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्यांचे महापालिकेने नुकतेच सर्वेक्षण केले. त्यानुसार काही खासगी टँकरमालक यांची यादी बनवण्यात आली आहे.

टँकरमालकांना नोटिसा

महापालिकेने सर्वेक्षण करून टँकरमालकांना नोटिसा दिल्या आहेत. त्यात मीरारोडमधील १६ , काशिमीरा १२, भाईंदर पश्चिम ९ , घोडबंदर ८, वरसावे ६, मुर्धा ते उत्तन भाग ४, गोडदेव ३, नवघर ३ अशा प्रकारे नोटिसा देण्यात आल्या आहेत. या सर्वांना महापालिकेने नोटिसा पाठवून ते पुरवत असलेल्या पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. परंतु यापैकी एकानेही अद्याप अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

मीरा-भाईंदर शहरामध्ये टँकरमालक हे खासगी बोरवेल, विहिरी, तलाव व इतर स्रोतातून पाणी उपसा करतात. त्या पाण्याचे नमुने कनिष्ठ वैधानिक अधिकारी, सार्वजनिक आरोग्य, प्रयोगशाळा कोकण भवन, नवी मुंबई येथून तपासणी करून पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दर आठवड्याला पाणीपुरवठा विभागात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल सादर न करता टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यास टँकरमालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

- दिपक खांबीत, शहर अभियंता, मीरा-भाईंदर महापालिका

logo
marathi.freepressjournal.in