लग्नसराईवर चोरट्यांचे सावट; धूमस्टाईल सोनसाखळीचोरांना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

लग्नसराईला सुरुवात झाली असून येत्या रविवारी आणि सोमवारपासून एप्रिल महिन्यासह मे, जूनपर्यंतच्या विविध शुभमुहूर्तावर भिवंडी तालुक्यातील शहरी भागासह, तर विशेष करून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यांचे आयोजन होत आहे.
लग्नसराईवर चोरट्यांचे सावट; धूमस्टाईल सोनसाखळीचोरांना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान
Published on

सुमित घरत/ भिवंडी

लग्नसराईला सुरुवात झाली असून येत्या रविवारी आणि सोमवारपासून एप्रिल महिन्यासह मे, जूनपर्यंतच्या विविध शुभमुहूर्तावर भिवंडी तालुक्यातील शहरी भागासह, तर विशेष करून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यांचे आयोजन होत आहे. अशा प्रसंगात धूमस्टाईल चोरट्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. लग्न सोहळ्यादरम्यानच्या कालावधीत सोनसाखळीसह मोबाइल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा घटनांवर रोख लावण्याचे आव्हान स्थानिक पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. याकरिता येत्या लग्नसराईच्या काळात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पुढील २० एप्रिल रोजीच्या रविवारी चैत्र कृ.७ भानुसप्तमीच्या आणि २१ एप्रिल रोजी सोमवारी कालाष्टमीच्या शुभमुहूर्तावर आणि एप्रिल, मे, जून महिन्यातील अशा वेगवेगळ्या शुभमुहूर्तांवर सर्वच समाजात विशेषतः आगरी समाजातील हळदी समारंभ आणि लग्नसराईचा दोन दिवसांचा कार्यक्रम भिवंडी तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात थाटामाटात पार पाडण्यासाठीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यातच सद्यस्थितीत अमेरिका, चीनच्या ‘टॅरिफ’ वादामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडल्याचे चित्र आहे. परंतु असे असतानाही लग्नसराईच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाकरिता सोन्याचा पेहराव करून मिरवण्यात वधू-वर मंडळींसह नातेवाईकांमध्ये चढाओढ सुरू असते. परंतु लग्नसराईचा बार उडवण्याच्या धांदलीत सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाला धूमस्टाईल सोनसाखळी चोरट्यांना रोखण्याचे आव्हान असणार आहे. तसेच याच प्रकारे मोबाइलचोरीच्या घटनांमध्येही बेसुमारीची वाढ झाली असून लग्नसराईच्या काळात अशा घटना घडल्यास त्याही नवीन नसाव्यात. यामुळे ‘बेगाने शादी मे, अब्दुल्ला दिवाना’ म्हणण्याची वेळ कोणावर येऊ नये, यासाठी पोलीस बंदाेबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

दागिने व वस्तूंची काळजी घ्या

- महागडे दागिने शक्यतो घरी ठेवा किंवा वेगळी सोय करा

- पर्स, मोबाइल हातात ठेवा, दुसऱ्याच्या हवाली करू नका

- कार्यक्रमांमध्ये अनोळखी व्यक्ती दिसल्यास लगेच माहिती द्या

- शक्य असल्यास सीसीटीव्ही आणि सिक्युरिटी ठेवा

logo
marathi.freepressjournal.in