मध्य वैतरणा परिसरावर तिसऱ्या डोळ्याची नजर; स्वयंचलित कॅमेऱ्याच्या माध्यमातून छुप्या गुन्हेगारीवर आळा बसणार

मुंबई शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोखाड्यातील कोचाळा येथे सन २०१२ मध्ये साकार झालेला आहे.
मध्य वैतरणा परिसरावर तिसऱ्या डोळ्याची नजर; स्वयंचलित कॅमेऱ्याच्या माध्यमातून छुप्या गुन्हेगारीवर आळा बसणार
Published on

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील बहुचर्चित मध्य वैतरणा प्रकल्प हद्दीत नुकतेच एका महिलेचे मुंडकेविरहीत शव आढळून आले आहे. दि.३ फेब्रुवारी रोजी एका पुरुष जातीचे शव सापडल्यानंतर अवघ्या काही दिवसांत हे दुसरे शव सापडले असल्याने मध्य वैतरणा परिसर जास्तच चर्चेत आला होता. त्यामुळे या ठिकाणी योग्य ती खबरदारीची उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी कारेगाव ग्रामपंचायतीशी समन्वय साधल्याने मध्य वैतरणा परिसरात अखेर स्वयंचलित कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

मुंबई शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मोखाड्यातील कोचाळा येथे सन २०१२ मध्ये साकार झालेला आहे. या प्रकल्पावर रहदारीसाठी आशिया खंडातील सर्वाधिक उंच, लांब, रुंद पूल उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा पूल आणि त्याखाली दुतर्फा पसरलेले पाणी पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहे. परंतु या ठिकाणी पर्यटक पादचारी आणि वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्याची खबरदारी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरात सर्रासपणे छुप्या गुन्हेगारीला वाव मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याप्रकरणी प्रशासनाचे तसेच पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती.

मध्य वैतरणा पुलाखाली दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी अनोळखी इसमाचे प्रेत शरीरावर वार केलेल्या अवस्थेत मिळून आले आहे, तर सन २०२१ मध्ये माधुरी विकास अहिरे या अंबड (नाशिक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या तरुणीचे शव पाण्यावर तरंगत्या अवस्थेत सापडले आहे. तसेच एकूणच जनजीवनाच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना कोणत्याही स्तरावरून राबवली गेलेली नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले असून गुन्हेगारी सर्रास बोकाळली आहे. मात्र संभाव्य अनूचित प्रकार रोखण्यासाठी कोणत्याही स्तरावरून सकारात्मक प्रयत्न झालेले नव्हते.

खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना

मध्य वैतरणा परिसरात एका बाजूला दाट झाडी व खोल दरी आहे. भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन मागील काही वर्षांत शहरी भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी प्रेतांची विल्हेवाट लावणे आदी गंभीर कामांसाठी परिसराचा वापर केलेला आहे. मध्य वैतरणेवरील पुलाची लांबी १५० मीटर असून पुलाची उंची ५० मीटर आहे. पुलांच्या उंचीच्या दुप्पट खोल दरी नदीपात्रात आहे. सद्यस्थितीत पाणीसाठा कमी झालेला असला तरी उन्हाळ्याच्या अखेरीपर्यंत पुलाच्या गळ्यापर्यंत पाण्याची उंची असते. सर्वार्थाने सुलभ झालेल्या परिस्थितीत सराईत गुन्हेगारांची गुन्हेगारी दुर्लक्षित आणि शाबूत राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून खबरदारीची उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे.

मौजे कारेगाव ग्रामपंचायतीने या ठिकाणी स्वयंचलित कॅमेरे बसवून खबरदारीची उपाययोजना केलेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूनेही उधळे वाकडपाडा ग्रामपंचायत हद्दीतही स्वयंचलित कॅमेरे बसवण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक प्रयत्न आहेत. लवकरच या ठिकाणीही स्वयंचलित कॅमेरे बसवण्यात येतील.

-कुलदीप जाधव गटविकास अधिकारी,पंचायत समिती, मोखाडा

logo
marathi.freepressjournal.in