ठाणे : कोपरी परिसरातील सुमारे एक लाखांहून अधिक नागरिकांना केंद्र सरकारकडून दोन नवीन जलकुंभांची भेट मिळाली आहे. भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोपरी येथील जुन्या जलकुंभांच्या जागी दोन नवीन जलकुंभ उभारण्यात येणार असून, यापुढील काळात कोपरीवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.
कोपरी येथे ४० वर्षांपूर्वी उभारलेल्या दोन जलकुंभांची दुरवस्था झाली आहे. या जलकुंभातील काही ठिकाणांहून पाण्याची गळती होत असल्यामुळे अस्वच्छता होत होती. त्याचबरोबर जलकुंभ कोसळून हानी होण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना १० एप्रिल २०२३ रोजी पत्र पाठवून केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून दोन्ही जलकुंभांच्या ठिकाणी नवीन जलकुंभांचे काम करण्याची मागणी केली होती. या योजनेच्या आराखड्यामध्ये कोपरी परिसराचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे चव्हाण यांच्याकडून भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या माध्यमातून महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता. कोपरी परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी जलकुंभ व पाणीवितरण व्यवस्था आवश्यक असल्याचे आग्रही पद्धतीने मांडले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, दोन्ही नवीन जलकुंभांच्या कामाला मंजुरी देण्यात आली.
केंद्र सरकारमुळे कोपरीकरांना 'अमृत' लाभले आहे, अशी प्रतिक्रिया ओमकार चव्हाण यांनी व्यक्त केली. कोपरीची लोकसंख्या एक लाखांपर्यंत पोचली असून, या नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या कामाला मंजुरी मिळविल्याबद्दल रहिवाशांच्या वतीने माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांचे आभार मानण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या अमृत योजनेतून जलकुंभांच्या कामाला मंजुरी मिळाली. नव्या जलकुंभांमुळे पुरेशा दाबाने कोपरी परिसरात पाणीपुरवठा होईल. येत्या दोन ते तीन दिवसांत कंत्राटदाराला कामाचा कार्यादेश दिला जाईल. त्यामुळे लवकर काम पूर्ण होऊन रहिवाशांना दिलासा मिळेल. तसेच या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार.
-भरत चव्हाण, माजी नगरसेवक