यंदा ठाण्यात जोरदार दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार

संस्कृती युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाउंडेशन व शिवसेना यांच्यातर्फे यंदा भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले
यंदा ठाण्यात जोरदार दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार

दहीहंडी सणांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा जोरदार दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. जगपातळीवर दहीहंडीचा थरार हा ठाण्यातूनच गेला असल्याने आयोजकांमध्येही यंदा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दहीहंडीचा विश्वविक्रम मोडणाऱ्या ठाण्यात यंदाही विश्वविक्रम होणार असून यंदा संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या उत्सवात १० थरांचा थरार पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे १० थर कोण लावणार याकडे बालगोपाळांना उत्सुकता लागली आहे. कोरोनासंकटाचे सावट असल्याने गेले २ वर्षे सर्वच उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. यंदा मात्र आपल्या शिंदे-फडणवीस हिंदुत्ववादी सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केल्याने दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. हिंदुत्वाचा हा आपला आवडता उत्सव होत असून संस्कृती युवा प्रतिष्ठानकडून ठाण्यात यंदा भव्य उत्सव होणार आहे व लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. २ वर्षानंंंतर दहीहंडी उत्सव मुक्तपणे साजरा करता येणार असल्याने राज्यभरात सर्व आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन करावे आणि हा हिंदुत्वाचा उत्सव जल्लोषात साजरा करावा, असे आवाहन संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.

संस्कृती युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाउंडेशन व शिवसेना यांच्यातर्फे यंदा भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. आज त्याबाबत आमदार सरनाईक आणि युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सुरक्षेचे सर्व नियम पालन करून हा उत्सव होणार असून दहीहंडीचा विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकास २१ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवात येणाऱ्या प्रत्येक पथकाला वेगवेगळे थर लावतील, तसे बक्षीस दिले जाईल. लाखो रुपयांची बक्षिसे आहेत. २ वर्षाने हा असा उत्सव आहे की ज्यात हजारो लाखो तरुण उत्सवाच्या निमित्ताने रस्त्यावर येऊन जल्लोष करणार आहेत आणि हा आपल्या हिंदुत्वाचा प्रमुख उत्सव आहे.

यंदा राज्य सरकारने उत्सव निर्बंधमुक्त केले असल्याने राज्यातील सर्व छोट्या मोठ्या उत्सव आयोजकानी जास्तीत जास्त भव्य प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करावे व बक्षिसे जाहीर करावित, जेणेकरून अधिकाधिक गोविंदा पथके यात सहभागी होतील. या दहीहंडी पथकाच्या माध्यमातून वर्षभर लोकांची सेवा होत असते, जी बक्षिसे मिळतात त्यातून सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम वर्षभर होतात, त्यामुळे दहीहंडी पथकांना रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. दहीहंडी पथकांना राज्यातील सर्व आयोजकांनी प्रोत्साहित करून यंदा हा दहीहंडी उत्सव अधिक उत्साहात व जल्लोषात साजरा करावा, असे सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in