यंदाच्या वर्षी लगीनघाईला १८ ते २० एप्रिलचाच मुहूर्त; २३ एप्रिल ते ३० जून कोणताही मुहूर्त नाही

२०२१ ते २२ ही दोन वर्ष कोरोना महामारीत गेली. कोरोना नियमांना सुख-दुःखाचे प्रसंग देखील अपवाद ठरले नाही. त्या प्रसंगांनाही नियमांच्या अधीन राहून सामोरे जावे लागत होते.
यंदाच्या वर्षी लगीनघाईला १८ ते २० एप्रिलचाच मुहूर्त; २३ एप्रिल ते ३० जून कोणताही मुहूर्त नाही
Published on

प्रतिनिधी/ठाणे

देशात एकीकडे निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढत असताना दुसरीकडे लगीनघाईनेही वेग धरला आहे. यंदा १८ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंतच विवाहासाठी शुभमुहूर्त असल्याने वऱ्‍हाडींचा हिरमोड झाला आहे. २० एप्रिलनंतर शुक्र अस्ताला जात असल्याने २३ एप्रिल ते ३० जूनपर्यंत विवाहास एकही शुभमुहूर्त नसल्याचे नवीन वर्षातील हिंदू पंचांगातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे लगीनघाई उकरण्यासाठी १८ ते २० एप्रिलचाच मुहूर्त वऱ्‍हाडी मंडळींना साधावा लागणार आहे.

२०२१ ते २२ ही दोन वर्ष कोरोना महामारीत गेली. कोरोना नियमांना सुख-दुःखाचे प्रसंग देखील अपवाद ठरले नाही. त्या प्रसंगांनाही नियमांच्या अधीन राहून सामोरे जावे लागत होते. त्याला लग्नसमारंभही अपवाद नव्हते. इच्छा असूनही लोकांना निमंत्रण देता येत नव्हते. अनेकदा लग्न करून वधू-वर घरी आल्यानंतरच लग्न झाल्याचे कळायचे. आता मात्र यंदा लगीनसराई धडाक्यात सुरू झाली आहे. कपडा मार्केट, ज्वेलरी शॉप, मंडप डेकोरेटर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांना सुगीचे दिवस आले असले तरी लगीनसराईसाठी नवीन पंचांगानुसार १८ ते २० एप्रिल असे फक्त ३ दिवसांचाच मुहूर्त असल्याने वऱ्‍हाडी मंडळींचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे ज्यांना २० एप्रिलनंतर विवाह करायचा असेल त्यांना काडमुहूर्तच शोधावा लागेल. अन्यथा ३० जूननंतरचाच मुहूर्त साधावा लागणार आहे. नवीन हिंदू पंचागात विवाह मुहूर्त केवळ २० एप्रिलपर्यंतच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अवघ्या ४ दिवसांत विवाह सोहळे आवरण्याची घाई वऱ्‍हाडी आणि वाजंत्रीवर येऊन ठेपली आहे.

एप्रिल व मे महिन्यांत अनेक लग्नाचे मुहूर्त असतात. त्यामुळे लगीनघाई जोरात सुरू असते; मात्र ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो. धनु आणि मीन राशीमध्ये सूर्याच्या संक्रमणामुळे गुरूचा प्रभाव कमजोर होतो. यामुळे ३० दिवस त्रास होतो. या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. सध्या सूर्याने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला आहे. १८ एप्रिल रोजी लग्नाचा शुभमुहूर्त आहे. हा दिवस मघा नक्षत्र आहे. १९ एप्रिल रोजी लग्नाचा मुहूर्त आहे. हा दिवस सुद्धा एकादशी आहे. तिथले नक्षत्र मघा आहे. एकादशी तिथीला लग्न करणे उत्तम मानले जाते.

गृहप्रवेशासाठीही नोव्हेंबरपर्यंत मुहूर्त नाही

अनेकांना नवीन घर घेतल्यानंतर गृहप्रवेश करण्यासाठी शुभ मुहूर्त साधायचा असतो; मात्र यंदा एप्रिल महिन्यात गृहप्रवेशासाठी एकही मुहूर्त नसल्याचे ज्योतिषशास्त्री श्रीहरी भट्ट यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता गृहप्रवेशासाठी नोव्हेंबर २०२४चा मुहूर्त साधावा लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in