उल्हासनगर : अंबरनाथच्या खेर सेक्शन परिसरातील प्रसिद्ध हेरंब गणपती मंदिरात बुधवारी पहाटे मोठी चोरी घडली होती. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील गणपतीचे सुमारे तीन किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि चार दानपेट्यांमधील रोख रक्कम लंपास केली होती. चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्हीच्या वायर्स तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे सीसीटीव्हीमध्ये कैद होणे त्यांच्यावरच उलटले. या गुन्ह्यात उल्हासनगर गुन्हे शाखेने तीन जणांना शिताफीने अटक केली आहे.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात झालेल्या चोरीचा जलदगतीने तपास हाती घेत आरोपी अरबाज मेहमूद खान, सतीश भाऊसाहेब भालेराव आणि रियान शेख यांना अंबरनाथ पश्चिमेतील जुना भेंडीपाडा मटका चौकातून सापळा रचून पकडले. चोरट्यांकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांसह एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्याची अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे.
ठाणे गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम युनिट पथकाचे हेड कॉन्स्टेबल चंदू पाटील, चंदू सावंत, प्रसाद तोंडलीकर, संजय शिरमाले, योगेश वाघ, पिंटू थोरवे, सतीश सपकाळे, मधुकर माळी आणि बाळा पाटील या तपास पथकाने या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे. उल्हासनगर गुन्हे अन्वेशन विभागाच्या या तडाखेबंद कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेची चर्चा रंगली असून, हेरंब मंदिरातील या चोरी प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.