
मुंबई : उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी मध्यरात्री छापेमारी करत भिवंडीतील विविध भागातून तीन तरुणांना अटक केली. या तरुणांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून, त्यांनी अंदाजे ३ लाख रुपये गोळा करून ती रक्कम पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप आहे.
मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (२२), अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (२२), जैद नोटियार अब्दुल कादिर (२२) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. सध्या तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्टच्या तपासात भिवंडीतून लाखोंची रक्कम पॅलेस्टाईनला पाठवली जात असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर यूपी एटीएसचे एक पथक शुक्रवारी भिवंडीत दाखल झाले. दिवसभर या तरुणांवर पाळत ठेवून शनिवारी दुपारच्या सुमारास भिवंडी शहरातील गुलजार नगर भागातील एका इमारतीत पथकाने अचानक छापेमारी करत अबू सुफियान तजम्मुल अन्सारी या तरुणाला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन आणि जैद नोटियार अब्दुल कादिर या अन्य दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पथकाने शनिवारी मध्यरात्री अन्य दोघांनाही शांतीनगर आणि निजामपुरा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांच्यावर रक्कम गोळा करून दहशतवाद्यांना विदेशांत पाठविल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकशीत हे तिघे टेरर फंडिंगमधील एका मोठ्या नेटवर्कसोबत जोडले गेल्याचे आढळून आले. ज्यामध्ये या तिघांवर दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्यता करण्याचा आरोप आहे. तिघांच्या चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. त्याआधारे ताब्यात घेतलेल्या तिन्ही तरुणांचे बँक खाते, मोबाईल डेटा तसेच कुणाकुणाला संपर्क साधला, याची कसून चौकशी केली जात आहे.
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरा या तिन्ही तरुणांना पुढील तपासासाठी लखनौच्या एटीएस कार्यलयात नेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.