
उल्हासनगर : डोंबिवली येथील कोळेगाव परिसरात राहणाऱ्या अनिल पाटील चाळीतून तीन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलांनी २१ दिवसांपूर्वी भारत-बांगलादेश सीमा ओलांडल्याचे उघड झाले असून, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.
गुप्त माहितीच्या आधारे उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने डोंबिवलीच्या कोळेगाव येथे छापा टाकला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रविण खोचरे आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी सुरेश जाधव, प्रकाश पाटील, शेखर भावेकर, महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे व कुसुम शिंदे यांनी ही धाड टाकली. या छाप्यामध्ये रोजिना बेगम सुकुर अली, तंजिला खातून रज्जाक शेख आणि शेफाली बेगम मुनिरुल शेख या तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी भारतात बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याची कबुली दिली. पोलीस तपासातून असे निष्पन्न झाले की, या महिलांनी भारतात प्रवेश करताना कोणतेही वैध कागदपत्र बाळगले नव्हते. त्यांची मानपाडा पोलीस ठाण्याला अधिक चौकशीसाठी सुपूर्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.
या प्रकरणाने कोळेगाव सारख्या भागात बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. अशा घटनांमुळे सीमारेषेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पोलीस प्रशासनाने अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांनी देखील आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.