
कल्याण : टिटवाळ्याच्या बल्याणी भागात केबीके या खासगी शाळेची संरक्षक भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली चिरडून एका ११ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजता घडली.
भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन मुलांना रहिवाशांनी ढिगारा उपसून बाहेर काढले. यात एका मुलाचा मृत्यू झाला असून दोन मुले जखमी झाली आहेत. शाळेच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या श्री कृपा चाळीतील मुले दुपारी घराबाहेर खेळताना शाळेची संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत अंश राजकुमार सिंग (११) हा मुलगा मृत पावला असून अभिषेक सोहनी (८) आणि सोहेब शेख (५) ही मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्यासह पोलीस प्रशासन तसेच पालिकेच्या शिक्षण विभागाने धाव घेतली.
रुक्मिणीबाई रुग्णालयात एका मुलावर उपचार सुरु असून एक मुलगा खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. दरम्यान, शाळेची भिंत बाहेरच्या बाजूने कमकुवत झाल्याच्या तक्रारी रहिवाशांनी अनेकदा शाळा प्रशासनाकडे केल्या होत्या. मात्र त्याकडे शाळेने दुर्लक्ष केले. शाळेचे ट्रस्टी सुबराव खराडे यांनी शाळेची भिंत तीन वर्षापूर्वी बांधली असून ती धोकादायक नसल्याचे सांगत रहिवाशाचे आरोप फेटाळले आहेत.
मृत अंशला ९ वर्षाची धाकटी बहीण असून त्याचे वडील टेलरिंगचे काम करतात, तर आई घरी असते. तर अभिषेक हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असून सोहेल याला एक भाऊ आणि बहीण आहे. छोटी-मोठी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब घरातील ही मुले याच शाळेत शिकतात.