

ठाणे : देशातील बहुराज्यीय सहकारी बँकांपैकी एक असलेल्या TJSB सहकारी बँक लिमिटेडने सलग दहा वर्षांहून अधिक काळ दरवर्षी १० एप्रिल रोजी आर्थिक निकाल जाहीर करण्याची परंपरा जपत आज २०२४–२५ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. नव्या कोर बँकिंग प्रणाली (CBS) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवरही बँकेने सातत्य कायम ठेवत पारदर्शकता आणि वेळेवर आर्थिक माहिती सादर केली आहे.
एकूण उलाढाल : ₹२३,१०४.८२ कोटी
ठेवी : ₹१४,८४८.६४ कोटी
कर्जे : ₹८,२५६.१८ कोटी
ढोबळ नफा : ₹२५२.०७ कोटी
निव्वळ नफा : ₹१८५.३८ कोटी
ढोबळ अनुत्पादित कर्जे : ३.५९%
निव्वळ अनुत्पादित कर्जे : ०%
टीजेएसबी सहकारी बँकेने या वर्षी अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे आता बँकेला शासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठीचे खाते आणि निवृत्त वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता; तसेच सार्वजनिक उपक्रम/महामंडळांकरिता अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी प्राधिकृत मान्यता मिळाली आहे. यावर्षी सिटिझन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गोवा यांचे यशस्वी विलीनीकरण झाले असून बँकेच्या नेटवर्कमध्ये सहा नवीन शाखांची भर पडली आहे. नव्या कोर बँकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे ग्राहक अनुभव व कार्यक्षमतेत मोठी सुधारणा झाली आहे.
बँकेचे अध्यक्ष शरद गांगल म्हणाले, “या वर्षीची कामगिरी केवळ आमच्या मजबूत आर्थिक पाया सिद्ध करत नाही तर सहकारी बँकिंगमधील नवे मापदंडही निश्चित करते. नव्या कोर बँकिंग प्रणालीमुळे व्यवहारांची गती, सुरक्षितता आणि उपलब्धता वाढली आहे. 'ग्राहक प्रथम' हेच आमचे धोरण असून, भविष्यातील नवकल्पनांचा पाया मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमचे ध्येय हे सहकारी बँकिंग क्षेत्रात आघाडीवर राहणे आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तिक सेवा यांचे समन्वयाला आमचे प्राधान्य आहे. डिजिटल नवकल्पना, ग्राहक-केंद्रित उपाययोजना आणि धोरणात्मक वाढ यावर आम्ही सतत भर देत आहोत.”
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर म्हणाले, “शासन निर्णय आणि यशस्वी विलीनीकरण हे आमच्या गुणवत्तापूर्ण सेवा व नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचे फलित आहे. या टप्प्यामुळे आम्हाला शासकीय विभागांची, कर्मचाऱ्यांची सेवा करण्याची आणि आमचे नेटवर्क वाढवण्याची संधी मिळाली आहे. गोवा राज्यातील आमचे अस्तित्व अधिक सशक्त झाले असून, बँकेची एकूण शाखा संख्या आता पाच राज्यांत १४९ वर पोहोचली आहे. पुढील वाटचालीत बँक शाखा विस्तार, डिजिटल सेवा व वित्तीय समावेशनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.”
टीजेएसबी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सीए वैभव सिंगवी, मान्यवर संचालक मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी हे सर्व पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
१९७२ मध्ये स्थापन झालेली टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड ही बहुराज्य अधिसूचित सहकारी बँक ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन, नाविन्यपूर्ण सेवा आणि मजबूत आर्थिक आधारामुळे ओळखली जाते. सध्या पाच राज्यांमध्ये १४९ शाखांचे विस्तृत जाळे असलेली ही बँक वैयक्तिक ग्राहकांसोबतच व्यवसायिकांच्या पसंतीचीही बँक ठरली आहे.