मराठी टक्का टिकवण्याचे महापालिका शाळांपूढे आव्हान

मराठी माध्यमांच्या शाळांचे होणार सक्षमीकरण
मराठी टक्का टिकवण्याचे महापालिका शाळांपूढे आव्हान

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यातही पालिकेच्या इंग्रजी, हिंदी आणि उर्दू शाळांची परिस्थिती समाधानकारक असली तरी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचा पट झपाट्याने खालावत असल्याचे उघड झाले आहे. अवघ्या चार वर्षांत सहा हजार मराठी विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. मात्र दुसरीकडे परप्रांतिय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे उघड होत असताना मराठी माध्यमांच्या शाळांचे सक्षमीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे महापालिका शाळांमधे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कधीकाळी लाखोंच्या घरात होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा टक्का मोठ्या प्रमाणात घसरू लागला आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाकाळात ती अधिक कमी झाली असल्याचे उघड झाले आहे. त्यातही मराठी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असताना दुसरीकडे पालिका शाळेत प्रवेश घेणाऱ्या परप्रांतिय विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढत चालली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शहरी परिसरात खासगी शाळांची संख्या दिवंसेदिवस वाढत असून आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे त्यातही इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी पालकांचा ओढा त्या शाळांकडे चांगलाच वाढला आहे. परिणामी भरमसाठ फी भरून मुलांना खासगी इंग्रजी शाळांमधे टाकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुलांना मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्य,रोज खिचडी अशा सुविधा देण्यात येत असतानाही महापालिका शाळांमधील मराठी विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.

विद्यार्थी संख्या टिकवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शिक्षण मंडळातील आठ गटशिक्षण अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. यामध्ये गोरगरीब वस्त्या, विशेषत: झोपडपट्ट्या टार्गेट करून पालकांच्या घरोघरी जावून त्यांची मनधरणी करण्याचे काम हे अधिकारी आणि शिक्षक करत होते, परंतू त्याचाही काही उपयोग झालेल्याचे दिसत नाही. फक्त मध्यमवर्गीयचे नव्हे तर अल्प उत्पन्न गटातील पालकही आपल्या पाल्यांना महापालिकेच्या शाळेत टाकण्यास तयार होत नसल्याने येत्या काही वर्षांत पालिकेच्या मराठी शाळा ओस पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामध्ये आता मराठी माध्यमांच्या शाळांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनने घेतला आहे.

मराठी पटसंख्या वाढवण्यासाठी होणार विशेष प्रयत्न

मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक सुविधा वाढवतानाच शाळांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी, प्रत्येकी वर्ग खोलीत स्मार्ट क्लासरूम, शिक्षकांना प्रशिक्षण , विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी उपाययोजना आणि शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in