ठाणे : ठाणे शहरातील दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या मुंब्रा मुख्य जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ संयोजन व पाणी गळती झाली असल्यामुळे परिसरात वारंवार कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मुंब्रा मुख्य जलवाहिनी ६६० मी.मी. व्यासाची असून, त्यामधून कल्याण फाटा ते मुंब्रा फायर ब्रिगेडपर्यंत ५२ द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा होतो. सदर जलवाहिनीचे दुरुस्तीचे व अनधिकृत कनेक्शन खंडित करण्याचे काम करण्याकरिता पाणीपुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे.
दिवा व मुंब्रा प्रभाग समितीमधील जलवाहिनीची गळती दुरुस्ती व अनधिकृत कनेक्शन खंडित करण्यासाठी बुधवार, १० जानेवारी रोजी सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत ८ तासांकरिता कल्याण फाटा येथून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.